अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड होणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केली. 
विद्यापीठाचे मराठीचे प्राध्यापक आणि माजी कुलगुरू म्हणून यशस्वी प्रशासक अशा दुहेरी भूमिकेची शिदोरी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पाठीशी आहे. भविष्याचा वेध घेणारा समीक्षक मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे, ही सर्वासाठी विशेषेकरून आपल्या विद्यापीठासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे डॉ. पांढरीपांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची संमेलनाध्यक्षपदी निवड जाहीर होताच डॉ. पांढरीपांडे यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन केले. इतर क्षेत्रांप्रमाणे साहित्य क्षेत्रातही वाद-प्रवाद जरूर आहेत. पण भाषेची सांस्कृतिक समृद्धी जपणे आवश्यक आहे. आपले व्यक्त होणे भाषेच्या माध्यमातूनच साध्य होते. ते अधिकाधिक प्रभावी कसे व्हावे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. मराठी भाषा, साहित्याला जागतिक पातळीवर पोहोचविण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे सर्वार्थाने प्रतिभा आहे. ती योग्य रंगरूपात व्यक्त झाली पाहिजे. यादृष्टीने डॉ. कोत्तापल्ले यांची अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वी ठरेल अन् त्यांचे येत्या वर्षांतील योगदान मराठी साहित्याच्या सर्वागीण वृद्धीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास डॉ. पांढरीपांडे यांनी व्यक्त केला.

Story img Loader