धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीने सांगली शहरातील सखल भागात असलेल्या काही उपनगरांत शिरकाव केला आहे. आज (गुरुवारी) सकाळी पूर पाहण्यासाठी गेलेला १५ वर्षांचा एक मुलगा भिलवडी पुलावरून कृष्णेच्या पात्रात वाहून गेला.
सांगलीतील पाच कुटुंबांचे काल रात्री उशिरा स्थलांतर करण्यात आले आहे, तर औदुंबर येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णेने जलाभिषेक केला. कृष्णेची पातळी झपाटय़ाने इशारा रेषेकडे धाव घेत असून आज सायंकाळी असणारी ३५ फुटाची पाणीपातळी उद्यापर्यंत दीड ते दोन फूट वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
कोयना धरणातील सोडलेले पाणी आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे कृष्णेच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी कृष्णेचा पूर पाहण्यासाठी गेलेला भिलवडी येथील निखिल पुरुषोत्तम पटेल (वय १५) हा दहावीत शिकणारा मुलगा कृष्णेच्या प्रवाहात वाहून गेला. तो सायकलवरून भिलवडी पुलावर गेला होता. एका बाजूने पाय टेकण्याच्या प्रयत्नात तो नदीच्या प्रवाहात पडला. नदीतील वाहत्या धारेत पडल्याने सायकलसह तो बेपत्ता झाला आहे. याबाबत पलूस पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नव्हता.
कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आला असून ६ स्वयंचलित वक्र दरवाजातून प्रतिसेकंदाला ६५ हजार ८७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होत आहे. सायंकाळी ५ वाजता संपलेल्या आठ तासांत कोयना येथे ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर चांदोली धरणातून १७ हजार ७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात आणि नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला, तरी पाण्याची आवक मात्र वाढती आहे.
कृष्णा नदीतील सांगलीच्या आयर्वनि पुलाजवळ आज सायंकाळी पाणी पातळी ३४ फूट ६ इंच होती. काल २९ फूट ३ इंच असणारी पाणीपातळी २४ तासांत ५ फूट ३ इंचांनी वाढली आहे. उद्यापर्यंत आणखी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या ठिकाणची ४० फूट ही इशारा पातळी असून ४५ फूट ही धोकापातळी आहे.
सांगलीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून कर्नाळ रोड, मगरमच्छ कॉलनी, जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, इनामदार प्लॉट या ठिकाणी सखल भागात कृष्णेचे पाणी शिरले आहे. सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी घुसल्याने येथील काही कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतर केले आहे. या कुटुंबांना जामवाडीतील महापालिकेच्या शाळेत तात्पुरते वास्तव्य करण्यास सांगण्यात आले आहे. पूररेषेच्या आत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना दक्ष राहण्याचे सूचना प्रशासनाने दिली असून, महापालिकेनेही रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे दक्ष खबरदारी घेण्याचे आवाहन केले केले आहे.
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, या ठिकाणाहून १८ हजार १९१ क्युसेक पाणी वारणा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या मळीच्या रानामध्ये वारणेचे पात्र शिरले असून, गेल्या चार दिवसांपासून पाणी साचले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. चिकुर्डे, मांगले, रेठरे, ऐतवडे आदी नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसला आहे.

Story img Loader