कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या स्थलांतराचा निर्णय रद्द करण्यात आला असला, तरी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अन्यत्र बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. हा राष्ट्रवादीचाच डाव असून वेगळय़ा मार्गाने हे कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष कैलास शेवाळे यांनी केला.
शेवाळे यांनी सांगितले, की तालुक्यातील कुकडीचे चा-यांचे अस्तरीकरण, गेट बांधणे, या चा-यांचे हस्तांतरण, जमिनी कालव्यात गेलेल्या शेतक-यांना मोबदला अशा सगळय़ाच गोष्टी अपूर्ण आहेत. मात्र केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मतदारसंघातील करमाळा येथे हे कार्यालय नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. त्याविरुद्ध संघर्ष करून हे कार्यालय येथे ठेवण्यास सरकारला भाग पाडले. मात्र राष्ट्रवादीने आता वेगळाचा मार्ग अवलंबला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालव्यांची अपूर्ण कामे व शेतक-यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी १० कोटींचा निधी जाहीर केला. मात्र हे सर्व केवळ कागदावरच राहिले. राष्ट्रवादीने या कार्यालयाचे स्थलांतर थांबवण्याचे नाटक निर्णयाद्वारे उभे केले, मात्र येथील कर्मचा-यांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. ते करताना येथे रिक्त झालेल्या जागांवर नवे कर्मचारी मात्र नेमण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यालय येथेच असले तरी त्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. कर्मचारी राहिले नाहीत तर कार्यालय आपोआप गोठवता येईल असा डाव राष्ट्रवादीचा आहे असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.

Story img Loader