वाई शहरातील कृष्णामाई उत्सवास मोठय़ा उत्साहात आज सुरूवात झाली. शिवकालापासून परंपरा असलेल्या उत्सवात आज भीमकुंड आळीच्या घाटावर कृष्णामाईची स्थापना झाली.
माघ शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत (या वर्षी ११ फेब्रुवारी ते २४ मार्च) या कालावधीत उत्सव होणार आहे. नदीला मातेचा दर्जा दिला आहे. नदीचा उत्सव साजरा होणारं वाई हे एकमेव ठिकाण आहे. प्रतापगडावरील अफजलखानच्या भेटीत शिवाजी महाराजांना विजय मिळवा यासाठीचा संकल्प कृष्णामातेला तत्कालीन वाईकर ग्रामस्थांनी केला होता. शिवाजींना विजय मिळाला आणि वाईत कृष्णामाई उत्सवाला सुरूवात झाली. त्याप्रमाणे मागील ३५० ते ४०० वर्षांपासून हा उत्सव वाईत साजरा होतो. वाई शहरात नदीकिनारी सात घाट आहेत. या सात फरसबंदी घाटावर (गल्ल्यांमध्ये) हा उत्सव साजरा होतो. भीमकुंड आळी (११ ते १४) मधली आळी (१४ ते २० फेब्रुवारी) धर्मपुरी (२० ते २६ फेब्रुवारी)गणपती आळी (२६ फेब्रुवारी ते ४ मार्च) ब्राह्मणशाही (४ ते १२ मार्च), रामडोह आळी (१३ ते १७ मार्च) गंगापुरी (१७ ते २४ मार्च) असा उत्सवाचा सातही घाटांवरचा कार्यक्रम आहे.
पेशवाई पद्धतीच्या मंडपात उत्सवापूर्वी उदकशांत होते. त्यानंतर श्री कृष्णामातेच्या मूर्तीची पालखीतून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघते. दिवाळसणाप्रमाणे सडा रांगोळी, पणत्या, फटाके लावून श्रींचे स्वागत केले जाते. घरोघरी खण- नारळ- साडी आदी ऐच्छिक पद्धतीने देवीची ओटी भरली जाते. दररोज श्रींच्या मंडपात रुद्राभिषेक, वैदिक मंत्रजागर, भजन कीर्तन, गायनाचे कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भव्य दिव्य कार्यक्रमात वाईतील सर्व जातीपातीचे लोक उत्साहाने सामील होतात. नोकरी, उद्योगधंद्या निमित्त बाहेरगावचे वाईकर येऊन दर्शन घेतात. श्रींच्या महाप्रसाद आणि लळिताच्या कीर्तनाने प्रत्येक घाटावरील उत्सवाची सांगता होते. सर्व आळीकर उत्साहाने या उत्सवाची तयारी करतात.