कराडची ग्रामदेवता कृष्णामाई देवीच्या चैत्रातील यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. यात्रा महोत्सवातील सोमवार (दि. २९) हा मुख्य दिवस आहे.
यात्रा महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर रामनवमीच्या मुहूर्तावर कृष्णा घाटावर डॉ. श्रीकांत सबनीस व सौ. विजया सबनीस या दाम्पत्याच्या हस्ते यात्रा मंडप व मखर पूजनाचा कार्यक्रम कृष्णा घाटावर पार पडला. दरम्यान, काल गुरूवारी कृष्णाबाईच्या पालखीच्या नगर प्रदक्षिणेने कृष्णाबाई यात्रा उत्सवास सुरूवात झाली. सायंकाळी ७ वाजता पुजारींच्या घरातून कृष्णाबाईची मखरात स्थापना करण्यात आली. रात्री ९ वाजता विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पालखी समवेत कृष्णाबाई यात्रा उत्सव कमिटीचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव वराडकर, विद्यमान अध्यक्ष जयंतराव खिरे, उपाध्यक्ष आनंदराव पालकर, विठ्ठलराव शिखरे, शरदराव मंत्री, श्रीपादराव पेंढारकर, मोहनराव गरूड, पांडुरंग करपे, प्रतापराव नलवडे, प्रमोद जोशी, संचालक सीताराम दिवेकर, मोहन वराडकर, अभय लाटकर, शिरीष गोडबोले, शेखर चरेगावकर, अनिल कुलकर्णी, संजीव खाडीलकर, रविंद्र कुलकर्णी, दत्तात्रय उमराणी तसेच व्यवस्थापक प्रकाश लांजेकर यांची उपस्थिती होती. पालखी मार्गावर सडा घालून रांगोळी काढण्यात आली होती. सुवासिनी पालखीतील कृष्णाबाईस ओवाळत होत्या. ग्रामदेवतेच्या दर्शनास कराडकरांनी गर्दी केली होती.  
उत्सवकाळात दररोज सकाळी श्रींची महापूजा, अभिषेक यानंतर महाप्रसाद समर्पण आणि आरती, तसेच रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रसिध्द कीर्तनकार हभप श्याममुरारी निजामपूरकर (पुणे) यांचे  कीर्तन होणार आहे. उद्या शनिवारी (दि. २७) दुपारी ३ ते ४ दत्त महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ५ श्री नाथ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, रात्री साडेसात ते १० हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हा एकपात्री कार्यक्रम. रविवारी (दि. २८) दुपारी ३ ते ४ कान्हाई महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ५ रामकृष्ण महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, रात्री साडेसात ते १० स्वरनिनाद हा संगीताचा सुरेल कार्यक्रम. सोमवारी (दि. २९) यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी ३ ते ४  समर्थ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ५ सदानंद महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. उत्सव काळात मंडपातील प्रसाद (बुंदी) वाटप येथील धोपाटे प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ३०) सकाळी ७ वाजता श्री कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. सायंकाळी ६ वाजता लळित कीर्तन, ७ वाजता वसंतपूजा तर रात्री १० वाजता येसूबाईची यात्रा होऊन कृष्णामाई यात्रा उत्सवाची सांगता होईल. यात्रेच्या मुख्य दिवशी रात्रीच्यावेळी होणारे शोभेचे दारूकाम यंदा दुष्काळामुळे रद्द करण्यात आल्याचे यात्र कमिटीने जाहीर केले आहे.
 

Story img Loader