पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत, याचा फायदा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदारांनी राज्यमंत्री सुरेश धस यांना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री करण्याची मागणी करून कोंडी करण्याचा डाव टाकला. परंतु सद्य राजकीय स्थिती लक्षात घेता निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री बदलण्याची िहमत पक्ष नेतृत्व करेलच, असे जाणकारांना वाटत नाही.
सध्या तरी महिना लोटूनही पक्षनेतृत्वाची भूमिका थंडच असल्याने पुन्हा एकदा क्षीरसागर यांनी पक्षांर्तगत विरोधकांवर मात केल्याचे दिसते.
जिल्हय़ात राष्ट्रवादीकडे विधानसभेचे ५, विधान परिषदेचे २ व डझनभर माजी आमदारांची फौज आहे. जि.प.सह बहुतांशी संस्था या पक्षाच्याच ताब्यात आहेत. लोकसभा वगळता पक्षाला राज्यात शंभर टक्के यश देणारा जिल्हा असल्याने पहिल्या खेपेत जयदत्त क्षीरसागर कॅबिनेट, तर प्रकाश सोळंके यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. पक्ष सलग १५ वर्षे सत्तेत असून गावपातळीवर पक्षात कार्यकर्त्यांची भरती आहे. अजित पवार यांनी खास लक्ष घालून सर्व मतदारसंघांत तरुण नेत्यांची नवी टीम बांधली. या नेत्यांच्या अपेक्षांनाही भरती आली आहे. वरून पक्ष एकसंध दिसत असला, तरी प्रत्यक्षात मात्र नेत्यांच्या गटांत विभागला गेला आहे. प्रत्येक नेता आपापल्या कार्यक्षेत्रापुरताच प्रभावशाली राहिला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना शह देण्यासाठी अजित पवार यांनी वर्षांनुवष्रे परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्यांना पक्षात आणून एका म्यानात अनेक तलवारींचा प्रयोग केला. राष्ट्रवादीत जिल्हाभर प्रभाव असलेले पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर हेच एकमेव नेते आहेत. पण अजित पवार यांनी पक्षात निर्माण केलेल्या युवा नेत्यांच्या टीमसाठी क्षीरसागरांना बीड मतदारसंघापुरतेच मर्यादित ठेवल्याने लोकसभेसाठी कोणाच्याही नावावर पक्षातच एकमत होत नाही. परिणामी मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास कोणी मनातून इच्छुक नसल्याचे खासगीत कबूल केले जाते. मात्र, मुंडेंना रोखणे हे पवारांचे ध्येय असल्याने मागील वर्षभरापासून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे.
या पाश्र्वभूमीवर क्षीरसागर यांना लोकसभेच्या मदानात उतरवून जिल्हय़ाच्या राजकारणातून बाजूला करण्याचा डाव पक्षांतर्गत पातळीवर खेळला जात आहे. मुंडे यांच्याविरुद्ध मदानात उतरविले की प्रत्येक जण आपले जुने-नवे राजकीय हिशेब पूर्ण करण्याची संधी साधून घेण्याचाच प्रयत्न करणार, हे निश्चित. हा डाव ओळखून सावध झालेले क्षीरसागर इच्छुक नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास राजकीय शक्ती मिळावी, या साठी राज्यमंत्री धस यांना पालकमंत्री करा, अशी मागणी केली जात आहे.
मागील महिन्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार विनायक मेटे, अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा यांची उपस्थिती होती. पवार यांनी नेत्यांची भूमिका समजावून घेताना क्षीरसागर यांचेही म्हणणे ऐकून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याच वेळी आपल्याविरुद्ध दंड थोपटणाऱ्यांचा समोरच क्षीरसागर यांनी खडय़ा शब्दांत समाचार घेतला. त्यामुळे पालकमंत्री बदलण्यावरून पक्षात उघडपणे दोन गट पडले आहेत. यात जातीय समीकरणही मांडले जाते. आमदार मेटे यांनी तर शिवसंग्रामच्या कार्यक्रमात क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती.
पक्षांतर्गत नेत्यांची गटबाजी लक्षात घेऊन पक्षनेतृत्वाने तूर्त सबुरीने घेण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर यांना बदलून नाराज करणे परवडणारे नाही. त्यामुळे कोणालाच दुखवायचे नाही, या भूमिकेने पक्षनेतृत्व शांत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोळंके यांना अचानक मंत्रिपदावरून काढणे, रमेश आडसकरांचा हक्क असताना अमरसिंह पंडित यांना आमदारकी मिळणे, अपेक्षा असताना विनायक मेटे यांची दखलही न घेणे, पालकमंत्री असूनही मतदारसंघापुरतेच मर्यादित करणे या पक्षनेतृत्वाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत खदखद निवडणुकीच्या तोंडावर चव्हाटय़ावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साहजिकच पक्षनेतृत्वाचाही गटबाजीला नियंत्रित ठेवताना कस लागणार आहे. राष्ट्रवादीत भाजपातून आलेल्या नेत्यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात उघड मोट बांधून दंड थोपटले. त्यातून शरद पवार यांच्यासमोरच पालकमंत्री बदलण्याची मागणी केली. मात्र, क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा अंर्तगत विरोधकांवर मात केल्याचे मानले जात आहे.