कुचीपुडी डान्स अ‍ॅकॅडमीचा २८ वा वर्धापन दिन अलिकडेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी संतांच्या अभंग रचनांवर आधारित ‘नृत्यांचा अभंग नृत्य खळी’ हा कार्यक्रम या वर्धापन दिनाचे प्रमुख वैशिष्टय़ होते. संस्थापक संचालिका विजया प्रसाद यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात अ‍ॅकॅडमीच्या शिष्यगणांनी संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, रामदास, तुकाराम आदी संतांच्या तसेच होनाजी बाळा यांच्या रचनांवर आधारित कुचीपुडी पद्धतीची नृत्ये सादर केली. बहिणाबाईच्या काव्याने विठुनामाच्या गजरात या कार्यक्रमाची सांगता झाली.
सुचित्रा राणे, दीप्ती नायर, संगीता नायक, मयुरा दळवी, सायली जोशी, दर्शना डांगे आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला. उपवन आर्ट फेस्टिव्हलचे अध्यक्ष अरुण कुमार, स्टेट बँकेचे सरव्यवस्थापक हरिहरन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. रसिका फडके यांनी संगीत संयोजन तर अमित राणे यांनी सूत्र संचालन केले.

दोन पुस्तकांचे प्रकाशन
परममित्र पब्लिकेशनच्या वतीने ‘नलपाकदर्पण’ आणि ‘सूत्रे चाणक्याची’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन अलीकडेच सहयोग मंदिरात झाले. नलपाकदर्पण हे नलराजा लिखित नलपाकदर्पणम् या संस्कृत पोथीचे प्रतिभा रानडे यांनी केलेले मराठी भाषांतर आहे तर सूत्रे ‘चाणक्याची..सूत्रे गव्हर्नसची’ डॉ. वसंत गोडसे यांनी लिहिले आहे. ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर आणि ज्येष्ठ अभ्यासक अशोक मोडक यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले. माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर पत्रकार मकरंद मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.   

बदलापूरमध्ये रोटरीचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
रोटरी क्लब क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया आणि आदर्श विद्या प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरमध्ये आदर्श व्यवसाय केंद्र सुरू केले आहे. आदर्श शाळेत कार्यरत या केंद्राच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील गावांमधील तरुणांना टर्नर, फिटर, मशिनिस्ट, प्लंबिंग, इलेक्ट्रीशियन, कार्पेटरी, मोबाइल रिपेअरिंग अशा विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रवीण गुप्ता, मिलिंद खिरे, श्रीराम समुद्र, विनोद जडे, जयंत पुरे, पराग पोतनीस, तुषार आपटे, उदय कोतवाल आणि रोटरीचे हेमंत पारसकर यांनी या उपक्रमास मदत केली आहे.     

    

Story img Loader