जिल्ह्य़ातील ७२ तलावांत कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या कुकडी कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उद्या (बुधवार) हे आवर्तन सोडण्यात येणार असून पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यांतील तलावांत ५.६३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
कुकडीच्या आवर्तनासंदर्भात आज मुंबई येथे झालेल्या बैठकीस विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे, पालकमंत्री बबनराव पाचपुते, पाटंबधारेमंत्री रामराजे निंबाळकर, आमदार राम शिंदे, आमदार विजय औटी, वल्लभ बेनके, अशोक पवार, धनश्याम शेलार यांच्यासह कुकडीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. महत्वाची बैठक असूनही नगरचे जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्य़ातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यांत दुष्काळी गंभीर चित्र आहे. खरिपापाठोपाठ रब्बीची पिकेही पाण्याअभावी जळू लागल्याने आजच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. अखेर पाणी सोडण्याचा निर्णय झाला, अशी माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते व आमदार राम शिंदे यांनी दिली.
आज दुपारी पावणेपाच वाजता वळसे यांच्या दालनात ही बैठक झाली. सर्वानुमते टेल टू हेड म्हणजे कर्जतपासून पारनेरपर्यंत पोलीस बंदोबस्तात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्जत तालुक्यातील सीना धरणावरील निमगांव गांगर्डासह २७ व जामखेड शहरासाठी चौंडी येथील कोल्हापूर बंधारा, श्रीगोंदे तालुक्यातील व पारनेर तालुक्यातील उर्वरीत पाझर व पिण्याचे पाण्याचे तलाव गरज पाहून भरण्याचा निर्णय झाला, असे आमदार शिंदे म्हणाले. हे आवर्तन किमान एक ते दीड महिना चालेल. कर्जत तालुक्यातील दूरगाव व थेरवडीसह कोपर्डी, चिलवडी, येसवडी, गंलाडवाडी व चौडीमुळे चापडगाव, दिघी यासह २७ तलावांत पाणी सोडावे, अशी मागणी आपण केली होती व ती मान्य करण्यात आली आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी धरणात पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पाणी वाया न घालवता काटकसरीने वापरावे, पाणी शिल्लक राहिले तर पुढील आवर्तनासाठी वापरता येईल, असे आवाहन जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केले.

Story img Loader