राज्य परिवहन एकीकडे कारभार सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य तऱ्हेने वापर करण्यात येत नसल्याचे नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. नाशिक येथे प्रत्येक सिंहस्थात परिवहन विभागास प्राप्त होणाऱ्या सुविधांचा नंतर वापरच होत नसल्याचे निरीक्षणही संघटनेच्या वतीने मांडण्यात आले आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी ही कैफियत मांडली आहे. राज्य परिवहन विभागाच्या नियोजनातील काही त्रुटीही त्यांनी दाखवून दिल्या आहेत. याआधी खास सिंहस्थासाठी पंचवटीतील औरंगाबाद रस्ता चौफुलीवर तपोवन बस स्थानक उभारण्यात आले होते. या स्थानकाचा त्यानंतर अद्याप उपयोगच करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सदरची जागा महानगरपालिकेने राज्य परिवहन मंडळास विनामूल्य दिलेली आहे. शहर बस वाहतुकीसंदर्भात तत्काळ टर्मिनस करण्याची आवश्यकता आहे. मुंबईहून कसाऱ्याकडे येणाऱ्या लोकल रेल्वेच्या येण्याजाण्याच्या वेळेस शिर्डीकडे ये-जा करण्यासाठी कसारा रेल्वे स्थानकाहून बससेवा सुरू करण्याची अनेक दिवसांपासून भाविक मागणी करत आहेत. परंतु, या मागणीकडे राज्य परिवहन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांची गैरसोय दूर करून कसारा रेल्वे स्थानकापासून शिर्डीकरिता इगतपुरी, घोटी, सिन्नर यामार्गे बससेवा सुरू केल्यास भाविकांना कमी वेळेत आणि कमी भाडय़ात शिर्डीला ये-जा करता येऊ शकेल, अशी सूचनाही बुरड यांनी केली आहे.
याशिवाय निमआराम गाडय़ा वगळून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या सर्व गाडय़ांनी घोटी, इगतपुरी गावातील जुन्या आग्रारोडचा वापर केल्यास किमान दोन लिटर डिझेलची बचत होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे यामुळे इगतपुरी आणि घोटी गावातील प्रवाशांची अनेक वर्षांपासून असलेली गावातील अधिकृत बस स्थानकावरच प्रवाशांची चढ-उतार करण्याची मागणी यामुळे पूर्ण होऊ शकेल. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जुन्या आग्रारोडचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे. असे असतानाही जुन्या आग्रारोडचा वापर अजूनही राज्य परिवहन मंडळाचे चालक-वाहक कोणत्या कारणासाठी करत नाहीत, असा प्रश्नही बुरड यांनी उपस्थित केला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या सर्व विभागात एकोपा, शिस्त, आर्थिक बचतीसाठी आवश्यक असून अन्य राज्यांप्रमाणे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्रवासी भाडय़ात ४० टक्के कपात करण्याची मागणीही त्यांनी केली
आहे.
बसगाडय़ांना लागणारे डिझेल आणि सुटय़ा भागांचे दर देशात सर्वत्र एकसारखे असतानाही महाराष्ट्रात अन्य राज्यांपेक्षा बसभाडे अधिक आहे. ग्रामीण भागातील अवैध प्रवासी वाहतुकीला उत्तर म्हणून परिवहन मंडळानेही मिनी गाडय़ांचा आधार घेण्याची गरज बुरड यांनी व्यक्त केली आहे. या सर्व सूचना आणि मागण्यांचा परिवहनमंत्र्यांनी विचार करावा, असेही बुरड यांनी सुचविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा