आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या विकास कामांना कधी मुहूर्त लागेल हे सांगणे अवघड असले तरी जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कामांची जबाबदारी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून ज्या घटकावर आहे, त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दिमतीला लवकरच नवीन मोटारगाडी येण्याचा मुहूर्त मात्र मुक्रर झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी दौरे करावे लागत असल्याने लक्षात घेऊन शासनाने सहा लाखापर्यंतची नवी मोटार घेण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. किमान या निमित्ताने का होईना, जिल्हा प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी.
मंत्री असो वा शासकीय अधिकारी नव्याने पदभार स्वीकारताना संबंधितांकडून कार्यालयातील सजावट करणे, आवडती मोटार खरेदी करणे अशा बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. तथापि, नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांना त्यात समाविष्ट करणे योग्य नाही. कारण, पदभार स्वीकारून सव्वा वर्षांहून अधिक काळ उलटल्यावर त्यांनी शासनाकडे नवी मोटार खरेदी करण्यास परवानगी मागितली. सध्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘इंडिको’ ही अलिशान म्हणता येईल, अशी मोटार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवेत तिला जवळपास सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. तांत्रीक कारणास्तव तिचा पुढील काळात वापर करण्यास प्रशासनाने असमर्थता व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
मग, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसाठी जुन्या निर्लेखीत वाहनांऐवजी नवीन वाहन खरेदी करण्यास परवानगी मिळावी असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनास पाठविण्यात आला. महसूल प्रशासनातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना संवैधानिक स्वरूपाची तसेच शासनाचा महत्वाचा दुवा म्हणून कामकाज हाताळावे लागते. त्याकरिता संबंधितांना क्षेत्रिय स्तरावर वेळोवेळी दौरे करावे लागतात. त्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या वापरातील जुने वाहन निर्लेखीत करून त्याऐवजी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
प्रशासनास सहा लाख रूपये किंमतीपर्यंतचे वाहन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१३-१४ मध्ये मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय अनुदानातून हा खर्च भागविण्याचे शासनाने म्हटले आहे.
नवीन वाहन ज्या अधिकाऱ्यांसाठी मंजूर झाले आहे, केवळ त्यांनाच त्याचा वापर शासकीय कामकाजासाठी करता येईल. अन्य अधिकाऱ्याकडे ते वाहन हस्तांतरीत करता येणार नाही, असे सूचित करण्यात आले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरू आहे. सिंहस्थातील विकास कामांसाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक राहिल्याने पुढील काळात धावपळीत आणखी वाढ होणार आहे.
सिंहस्थ कामांसाठी निधी उपलब्ध झाला असला तरी कामांचा श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. परंतु, या सर्व कामांची जबाबदारी नेटाने पार पाडण्यात ज्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे, त्यांच्यासाठी नव्या वाहनाची उपलब्धता करून दिलासा दिला आहे. यापूर्वीच्या तंत्रज्ञानात निष्णात असणाऱ्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी तर इंडिया बुल्स कंपनीकडून दिल्या गेलेल्या अलिशान मोटारीचा वापर केला होता. या कंपनीच्या सेझ प्रकल्पाला सिन्नर तालुक्यात जमीन भूसंपादीत करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. फारसे वाद विवाद होऊ न देता अतिशय शांततेने ही भूसंपादन प्रक्रिया पार पाडल्याबद्दल त्या जिल्हाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले होते.

Story img Loader