कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी, तीन कोटी नागरिकांनी नदीत एकाच वेळी स्नान करणे, त्यामुळे होणारे प्रदूषण, भाडोत्री साधू, अमली पदार्थाचा व्यापार यावर चर्चा करीत अनेकांनी कुंभमेळ्यास विरोध दर्शवला. तर कुंभमेळ्यामागचे अर्थकारण लक्षात घेऊन ‘टुरिस्ट अट्रॅकशन’ म्हणून त्याचे ‘पॅकेज’ करता येईल का, अशी बाजूही कुणी मांडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘कुंभमेळा – श्रद्धा की अंधश्रद्धा’ या विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांनी आपली मते व्यक्त केली. समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर या वेळी उपस्थित होते.
दाभोलकर म्हणाले, ‘‘घटनेने प्रत्येक व्यक्तीस श्रद्धापालनाचा अधिकार देण्याबरोबरच श्रद्धेची तपासणी करण्यासही सांगितले आहे. मानसिक गुलामगिरीला लाभलेल्या पावित्र्याचे उदाहरण म्हणजे कुंभमेळा आहे. तीन कोटी लोक एकाच वेळी नदीत उतरतात तेव्हा त्या पाण्याचे काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. कुंभमेळ्यातून रोजगार उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्या व्यवसायातून उत्पादन घडत नसेल ती पैशांची उधळपट्टीच म्हणावी लागेल. देशाची जगासमोरची प्रतिमा अशी असावी का? सामान्य नागरिकांनी भरलेला कर कुंभमेळ्यासाठी वापरला जात असेल तर त्याला आक्षेप का नसावा.’’