एके काळी राज्यात धुळ्याचे नावलौकिक राखलेल्या कुस्तीने आता आधुनिकतेचे धडे गिरविण्याचा चंग बांधला आहे. या दृष्टिकोनातून कै. महादेव अंपळकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी येथे साकारण्यात आलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्र व व्यायामशाळेचे उद्घाटन ८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष भामरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे उपस्थित राहणार आहेत.
कुस्तीशी दोस्ती जपणाऱ्या अंपळकर कुटुंबीयांनी या केंद्रासाठी स्वमालकीचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. तब्बल १० हजार चौरस फूट क्षेत्रावर आकारला आलेली हरहर महादेव सेवा संस्था संचालित ही आधुनिक व्यायामशाळा आणि कुस्ती प्रशिक्षण केंद्र संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकमेव ठरणार असल्याचे सांगितले जाते. नाशिकचा अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रात अन्य कुठेही नसेल असा कुस्तीचा आखाडा धुळ्यातील सतीश व गजेंद्र अंपळकर यांनी प्रत्यक्षात आणला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणतीही शासकीय मदत न घेता अंपळकर बांधवांनी लाखो रुपये खर्च करून या केंद्राद्वारे उमद्या कुस्तीगिरांना भविष्य घडविण्यासाठीचे दालन खुले करून दिले आहे. चाळीसगाव चौफुलीजवळ असणाऱ्या केंद्रात कुस्ती प्रशिक्षणासाठी आधुनिक पद्धतीची मॅट आणि त्यासाठी बांधलेला सहा हजार ५०० चौरस फुटाचे सभागृह, २५ बाय २५ आकाराचा कुस्तीचा स्वतंत्र आखाडा, चार स्वच्छतागृहे आदी सुविधांचा समावेश आहे.
राज्यातील कुस्तीची मक्तेदारी समजणाऱ्या कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या तुलनेत धुळ्यातील हे केंद्र कमी लेखता येणार नाही. व्यायामशाळेतील मातीचा आखाडा, आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट, व्यायामशाळा, मल्लखांब प्रशिक्षणाची खास व्यवस्था, खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था आणि मल्लांसाठी राष्ट्रीयस्तरावर काम करणारे प्रशिक्षक आदी सुविधा पुरविण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध गटांत कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता स्पर्धकांची वजन तपासणी मंगळवारी केंद्रातच होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
धुळ्यात कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्या उद्घाटन
एके काळी राज्यात धुळ्याचे नावलौकिक राखलेल्या कुस्तीने आता आधुनिकतेचे धडे गिरविण्याचा चंग बांधला आहे. या दृष्टिकोनातून कै. महादेव अंपळकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी येथे साकारण्यात आलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्र व व्यायामशाळेचे
First published on: 07-05-2013 at 02:40 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushti training center inauguration in dhule