आयुष्यभर कष्ट करीत स्वाभिमानाने महाराष्ट्रात स्वत:चे आगळे राजकीय स्थान मिळविणाऱ्या क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांच्या नावाने मुंबई येथे सिडकोतर्फे जागा मिळवून कष्टकरी भवन बांधण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे दिली. नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या सांगता सोहळ्यानिमित्त बुधवारी समारोह संयोजन समिती, मनमाड नगर परिषद, वंजारी विकास परिषद आणि संघर्ष समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोजन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ धात्रक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हरिश्चंद्र चव्हाण, खा. समीर भुजबळ, आ. जितेंद्र आव्हाड, आ. पंकज भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाईक यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आजच्या पिढीला जाणीव व्हावी यासाठी कष्टकरी भवनची उभारणी करण्यात येईल असेही पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान व ईराणच्या स्पर्धेत भारतातील कांद्याचे भाव टिकून रहावेत यासाठी निर्यातमूल्य शून्य टक्क्यांवर आणण्याचा निर्णय एक- दोन दिवसात घेण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांना योग्य न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री भुजबळ यांनी नाईकांच्या जीवन चरित्राचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, उत्तम सामाजिक काम करणाऱ्यांना शासनाच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली. त्यांचा वारसा जपण्यासाठी आपआपसातील मतभेद दूर सारून एकत्र येण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांच्या माध्यमातून समाजाची वेगळी ओळख यापुढे जागृत ठेवायची असल्याचे नमूद करत समाजाला उपेक्षित ठेवू नका असे आवाहन केले. मराठा समाजाचे वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय झाले. वंजारी समाज मात्र मागे पडला. या समाजाची ताकद ओळखून त्यास राज्याच्या राकारणाच्या मुख्य प्रवाहात ठेवावे. हा समाज राज्याला निश्चित वेगळी दिशा देईल असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पवार यांच्या हस्ते क्रांतीवीर नाईक यांच्या नावाने मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन बाजारभावांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यामुळे शेतकरी घरात बसून भावाची सद्यस्थिती पाहू शकतील, असे बाजार समिती सभापती प्रकाश घुगे यांनी सांगितले. कामगार नेते बळवंत आव्हाड यांनी संपादित केलेल्या ‘व्रतस्थ’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या निमित्त आयोजित क्रांतीदौड विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2013 रोजी प्रकाशित
वसंतराव नाईक यांच्या नावाने मुंबईत कष्टकरी भवन
आयुष्यभर कष्ट करीत स्वाभिमानाने महाराष्ट्रात स्वत:चे आगळे राजकीय स्थान मिळविणाऱ्या क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांच्या नावाने मुंबई येथे सिडकोतर्फे जागा मिळवून कष्टकरी भवन बांधण्यात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-12-2013 at 09:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laborer bhavan in the name of vasantrao naik in mumbai