कोल्हार ते कोपरगाव रस्त्याने आठच दिवसांत तिसरा बळी घेतला. खड्डय़ामुळे पलटी झालेल्या मालमोटारीखाली दबून मजुराचे निधन झाले.
बाबुराव भिकाजी भालेराव, (वय-४५, रा. डो-हाळे) असे या दुर्घटनेत बळी गेलेल्या मजुराचे नाव आहे. दुपारी अडीचच्या सुमारास शिर्डीकडून अहमदाबादकडे चाललेली मालमोटार (क्रमांक टीएन ५२ ओ ६५०७) ही निमगावजवळ रस्त्यातील एका खड्डय़ात कलंडल्याने पलटी झाली. त्याच वेळी बाबुराव भालेराव हे सायकलवरून सावळीविहीर येथे बाजारास चालले होते. ही कलंडलेली मालमोटार नेमकी त्यांच्याच अंगावर पडून ते त्याखाली दबले गेले. नागरिकांनी माल बाजूला केला. तोपर्यंत भालेराव यांचा मृत्यू झाला होता. प्रशांत भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी मालमोटार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला.
चार-पाच दिवसांपूर्वीच तरुण-तरुणीचा या रस्त्यावरील खड्डय़ांमुळेच मृत्यू झाला. ते दोघे कोपरगावकडे जात असताना शिर्डीजवळ रस्त्यावरील खड्डय़ात मोटारसायकल आदळून हे दोघे पडले आणि मागून येणा-या मालमोटारीखाली चिरडले गेले होते. या अपघाताला आठवडाही होत नाही तोच खड्डय़ांमुळेच आता मजुराचा बळी गेला. गेल्या महिन्यात शिवराज्य पक्षाने कोल्हार कोपरगाव रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी उपोषण केले होते. तथापि आजपर्यंतही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघाताची मालिका सातत्याने सुरू असून, यामध्ये अनेकांचे बळी जात आहेत. आजच्या घटनेनंतर शिवराज्य पक्षाच्या वतीने नितीन उदमले व सचिन चौगले यांनी शिर्डी पोलिसात लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणा-या मृत्यूला बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा