बेसा मार्गावरील हरिहर नगरात गेल्या वर्षभरापासून वसलेल्या एका झोपडपट्टीला आग लागल्याने त्यात २५ पेक्षा अधिक झोपडय़ांची राख झाली असून सुदैवाने मनुष्यहानी मात्र झाली नाही.  बेसा मार्गावर हरिहर एका नगरात निवासी संकुलाचे काम सुरू असून त्या संकुलाचे काम करणारे मजूर झोपडपट्टीमध्ये राहत होते. जवळपास ३० ते ३५ झोपडय़ा त्या भागात उभारण्यात आल्या असून त्यात ही मोलमजुरी करणारे राहत होते. सर्वच मंजूर बाहेरच्या राज्यातील असल्यामुळे अनेकजण एकटे राहत होते. आज सकाळी १० वाजता सर्व मंजूर कामासाठी बाहेर पडल्यावर दुपारी १२ च्या सुमारास एका झोपडीला आग लागताच ती आग इतक्या वेगात पसरली की आजूबाजूच्या २५ पेक्षा अधिक झोपडय़ा अवघ्या एक तासात जळून खाक झाल्या.
ज्यावेळी आग लागली त्यावेळी सर्व मजूर कामावर गेले होते. काही मजुरांच्या पत्नी झोपडीमध्ये होत्या मात्र, त्याही आग लागण्याच्या दहा मिनिटे आधीच बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आग लागल्याचे बातमी कळताच सर्व मजूर झोपटपट्टीजवळ जमा झाले. अग्निशामक विभागाला सूचना दिल्यानंतर दोन गाडय़ा घटनास्थळी आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दहा मिनिटात आग आटोक्यात आणली.या झोपडपट्टीच्या बाजूला हरिहरनगर कॉलनी आहे. झोपडपट्टीमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू आणि कपडे असून ते जळून खाक झाले होते. या आगीसंदर्भात अग्निशामक विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले, एका झोपडीला आग लागल्याने ती पसरत गेली आहे. बिल्डरकडे काम करणारे सर्व मजूर या झोपडपट्टीमध्ये राहत होते मात्र ते सर्व कामाला गेल्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. आगीचे कारण समजले नाही.त्याचा शोध घेतला जात असल्याचे उचके यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा