नांदेड जिल्ह्य़ाचा राष्ट्रवादीचा संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तरी मध्यंतरीच्या काळात मी संपर्कमंत्री नव्हतो. आता स्थगिती उठवून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा आपणाकडे ही जबाबदारी सोपविली आहे. पक्षाचे पाठबळ न मिळाल्यामुळेच जिल्ह्यात राष्ट्रवादीची पीछेहाट होत असल्याची कबुली नव्याने संपर्कमंत्री म्हणून रुजू झालेले सुनील तटकरे यांनी दिली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईलच. त्यासाठी २६-२२ हा जागावाटपाचा फॉम्र्युला ठरला आहे. मतदारसंघ अदला-बदलाची कोणतीही चर्चा झाली नसतानाच काँग्रेसवाले ही जागा आमची, ती तुमची अशी चर्चा करून कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असा टोलाही तटकरे यांनी मित्रपक्षाला लगावला.
तिसऱ्यांदा नांदेडची राष्ट्रवादी संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तटकरे प्रथमच शनिवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतल्यानंतर मिनी सह्य़ाद्री अतिथीगृहावर कार्यकर्त्यांच्या बठकीस ते मार्गदर्शन करीत होते. नांदेडात पक्ष कार्यकर्त्यांनी व स्थानिक नेतृत्वाने मेहनतीने पक्ष वाढविला. पक्षश्रेष्ठींनी ताकद दिली असती तर मित्रपक्ष काँग्रेसशी मुकाबला करण्याची वेळ आली नसती, अशी स्पष्ट कबुलीही तटकरे यांनी या वेळी दिली. कोकणात राष्ट्रवादीला विरोधी पक्षाचा सामना करावा लागतो. दुर्दैवाने नांदेडात मात्र मित्रपक्ष काँग्रेसशी मुकाबला करावा लागत आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला पक्षश्रेष्ठींकडून पाठबळ मिळाले असते तर पक्ष यापेक्षाही अधिक बळकट राहिला असता, असे तटकरे यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर, आमदार प्रदीप नाईक, शंकर धोंडगे, माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार डी. बी. पाटील आदी उपस्थित होते.
‘पक्षाचे पाठबळ नसल्यानेच नांदेडात राष्ट्रवादीची पीछेहाट’
पक्षाचे पाठबळ न मिळाल्यामुळेच जिल्ह्यात राष्ट्रवादीची पीछेहाट होत असल्याची कबुली नव्याने संपर्कमंत्री म्हणून रुजू झालेले सुनील तटकरे यांनी दिली.
First published on: 18-08-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of support puts ncp in backfront tatkare