बनावट शिक्क्यांच्या साह्य़ाने वाहन खरेदीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या वाहनांवर कर्ज काढून विविध बँकांची तब्बल ६० लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा जणांना वाशी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्यांच्याकडून राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, आरटीओ, तहसीलदार कार्यालय, उपनिबंधक, आयकर विभाग आणि नोटरी आदीचे ५३७ बनावट रबरी शिक्के यांच्यासह संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर जप्त करण्यात आले असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे यांनी दिली आहे.
वाशीतील एका बँकेची या आरोपींनी वाहन कर्ज घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास करत असताना यातील आरोपी संतोष चंद्रकांत मांजेरकर हा वरळी कोळीवाडा येथे येणार असल्याची माहिती पठारे यांना खबऱ्याकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या पथकाने वरळी कोळीवाडा येथे सापळा लावला होता. दुपारी तीनच्या सुमारास तेथे आलेल्या मांजेरकर याला या पथकाने अटक केले.
मांजेरकर याला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने या गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांताक्रूझ येथील यशवंत नगरमधील त्याच्या घरातून राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, आरटीओ, तहसीलदार कार्यालय, उपनिबंधक, आयकर विभाग आणि नोटरीचे आदीचे ५३७ बनावट रबरी शिक्के यांच्यासह संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर आदी साहित्य जप्त केले. या कामात त्याला मदत करणारा राजकुमार प्रकाश भालंबर याला दादरमधील नायगाव हेडक्र्वाटर चाळमधून अटक करण्यात आली.
बनावट कागदपत्रांच्या साह्य़ाने वाहन खरेदी न करता हे दोन्ही आरोपी कर्ज काढण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे या साहित्याने तयार करीत होती. आता प्रयत्न बँकांची ६० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या आरोपींविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पठारे यांनी दिली आहे. या आरोपींनी अजून किती बँकांची फसवणूक केली असून या गुन्हात आणखी किती जण सहभागी आहेत याचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या रबरी शिक्क्यांमध्ये १८ बँका, कुर्ला, ठाणे, मुंबई शहर, कल्याण, अंधेरी, कर्जत, बोरिवली आणि पनवेल आदी साहाय्यक उपनिबंधक कार्यालय, मुंबई, कल्याण आयकर अधिकाऱ्यांचे शिक्के आणि पेण आणि रायगड आरटीओचे शिक्के, विक्रोळी आणि गेट्रर मुंबई नोटरीचे शिक्के तसेच पेंडावे ग्रामपंचायत तलाठी आणि सरपंच यांच्या शिक्क्यांचा समावेश आहे. याच बरोबर कोरे रेशन कार्ड, कोरे आरटीओ वाहन परवाना, कोरे खरेदी-विक्री व्यवहाराचे कागदपत्रे, बनावट पॅनकार्ड आणि बनावट मतदान ओळखपत्रदेखील हस्तगत करण्यात आले आहे.
बँकातून वाहन तारण कर्ज काढून लाखो रुपयांची फसवणूक
बनावट शिक्क्यांच्या साह्य़ाने वाहन खरेदीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या वाहनांवर कर्ज काढून विविध बँकांची तब्बल ६० लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा जणांना वाशी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-07-2014 at 06:58 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lacks of rupees fraud