यशवंतराव चव्हाण व्यासपीठ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत २२ जानेवारीला दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात जिल्हा महिला व युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्य़ातील ५ कर्तृत्ववान महिलांचा वेणूताई चव्हाण जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार होणार आहे.
व्यासपीठाचे अध्यक्ष रामनाथ वाघ व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनी ही माहिती दिली. महिलांवरील वाढते अत्याचार, त्याविरोधातील उपाययोजना, कौटुंबिक हिंसाचार व त्याची कारणे, महिलांच्या शिक्षणातील अडथळे, महिलांची सुरक्षितता अशा विविध विषयांवर महिला व युवती मेळाव्यात विचारमंथन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मेळाव्यात महिलांबरोबर प्रा. डॉ. अरूंधती पाटील ऊर्फ झुबा पटेल (संचालिका, मानव सेवा केंद्र अंबाजोगाई) व प्रा. डॉ. अलका गायकवाड (भारतीय महाविद्यालय, अमरावती) या संवाद साधणार आहेत.
मेळाव्यात श्रीमती मेधाताई काळे, मिनाताई मुनोत, मंदाताई चव्हाण, डॉ. शोभा आरोळे, मंदाताई निमसे या महिलांना वेणूताई चव्हाण जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. कार्यक्रमाला महापौर शीलाताई शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, जि. प. च्या उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे, वंदना पवार आदी उपस्थित राहणार आहेत.