भावी पतीसोबत पुण्यातून शिर्डी येथे दर्शनाला निघालेल्या तरुणीचे वाटेत नगर येथे अपहरण करून तिला धुळे येथील कुंटणखान्यात नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंटणखान्यात आलेल्या काही व्यक्तींच्या माध्यमातून या तरुणीची माहिती तिच्या भावी पतीपर्यंत पोहोचल्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता व पुणे पोलिसांच्या सतर्कतेने तरुणीची सुटका झाली. या प्रकरणी नगर पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, मात्र हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित तरुणी व तिचा भावी पती असलेला तरुण मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. हा तरुण पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राहतो. ही तरुणी त्याच्या गावाकडील असून, तिच्याशी त्याचा विवाह ठरला आहे.  ३ जानेवारीला दोघांनी शिर्डी दर्शनाला जाण्याचे ठरविले. त्यानुसार ते मोटारीतून निघाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नगर येथील बिगबझार जवळ हा तरुण काही कारणाने मोटारीतून थोडा वेळ उतरला होता.  त्यावेळी पांढऱ्या मोटारीतून आलेल्या चौघांनी तरुणीच्या तोंडाला रूमाल लावला. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. तरुणीला जाग आली तेव्हा ती एका घरात होती. तिला धुळे येथील एका कुंटणखान्यात ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यासाठी तिच्याकडे काही लोकांना पाठविण्यात आले होते. मात्र, तिने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगून आपल्याला मदत करण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे भावी पतीचा दूरध्वनी क्रमांकही दिला. त्यानुसार दोन जणांनी या क्रमांकावर संपर्क साधून या तरुणीची माहिती दिली. या तरुणाने कोथरूड येथील राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांना या प्रकार कळविला. एका पत्रकाराच्या मदतीने पवळे यांनी पुणे पोलिसांच्या समाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या कानावर हा प्रकार घातला. बर्गे यांनी याची माहिती धुळे येथील शिरपूर पोलीस ठाण्याला दिली. शिरपूर पोलिसांनी तिच्या भावी पतीसह त्या कुंटणखान्यात जाऊन चौकशी केली, पण ती तरुणी मिळाली नाही. धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मात्र सूत्रे फिरली. शिरपूर पोलिसांनी त्या कुंटणखान्यातील एका महिलेला त्या तरुणीस घेऊन बोलविले. एक महिला त्या तरुणीस पोलीस ठाण्यात घेऊन आली. त्या तरुणीकडून तक्रार नोंदवायची नसल्याचा जबाब शिरपूर पोलिसांनी लिहून घेतला. धुळ्याच्या या कुंटणखान्यात आणखी पाच तरुणी असल्याचे या तरुणीने पुण्यात आल्यानंतर सांगितले. या गुन्ह्य़ाचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून तो नगर येथील तोफखाना ठाण्यात वर्ग करण्यासाठी पाठविला. मात्र, सुरुवातीला तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी नगर पोलीस अधीक्षकांना गुन्ह्य़ाचे गांभीर्य सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यात आला.
तरुण-तरुणीला तोफखाना पोलिसांकडून मारहाण !
पुण्यात गुन्हा दाखल करून तो नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेलेल्या या तरुण-तरुणीला बेदम मारहाण केली. सुरुवातीस गुन्हाही दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. याबाबत नगरचे पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी सांगितले की, याबाबत माझ्याकडे मारहाण झाल्याची बाब कानावर आलेली नाही. मात्र, असा प्रकार घडला असल्यास गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल.

Story img Loader