डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यात मकर संक्रांतीनिमित्त आयोजित महिला मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ७ लाख ७७ हजार ७७७व्या पोत्याचे पूजन करण्यात आले.उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, भूमच्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते साखरपोत्याचे पूजन करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील पाचशेपेक्षा अधिक महिला या वेळी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे होते. अशा मेळाव्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस चालना मिळेल, असे मत महिला अधिकाऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. तसेच अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल गोरे यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात गोरे यांनी कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अनुपमादेवी गोरे, मंदाकिनी कोळगे, मंगला देशमुख, सुलोचना रणदिवे, श्यामल सोनटक्के यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.