दुष्काळात कोरडेठाक पडलेले तलाव पावसामुळे भरले. परंतु गळतीमुळे पुन्हा रिकामे होत चालल्याचे चित्र सध्या तुळजापूर तालुक्यात तयार झाले आहे. तालुक्यातील होर्टी साठवण तलाव क्रमांक दोनला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू आहे. गळतीमुळे तलावातील पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. लघुपाटबंधारे विभागाकडून या तलावाची गळती थांबविण्यास वेळीच प्रयत्न होत नसल्याने संबंधित विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
मागील सलग दोन वर्षे भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तुळजापूरच्या शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने बऱ्यापकी दिलासा दिला. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा आजपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील पाझर, साठवण तलावांमध्ये बऱ्यापकी पाणीसाठा झाला. मात्र, यातील काही तलावांना मोठय़ा प्रमाणात गळती लागून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून जात आहे. ही स्थिती कायम राहिल्यास व गळती थांबविण्यासाठी प्रयत्न न झाल्यास हे तलाव पुन्हा लवकर कोरडे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. होर्टी साठवण तलाव क्रमांक दोनला तलावात पाणी जमा झाल्यापासूनच गळती सुरू आहे. मागील वर्षी याच तलावात कमी पावसामुळे चिटपाखराला प्यायलाही पाणी नव्हते. यंदा समाधानकारक पाऊस होऊन तलावात चांगला साठा झाला. मात्र, गळतीमुळे तलावातील पाणी झपाटय़ाने कमी होत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
होर्टी शिवारातील साठवण तलाव क्रमांक दोनच्या खाली मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येते. तलाव पूर्ण भरल्यास परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. मात्र, गळतीमुळे तलावात भविष्यात पाणी राहणार की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. गळतीमुळे तलाव रिकामा झाल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. पाटबंधारे विभागाकडून मात्र अजूनही या बाबत दखल घेतली गेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा