विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या आणि महागाईने नागरिक त्रस्त असताना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्याची आकर्षक रंगोरंगोटी आणि सजावटीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
सजावटीत कमतरता राहू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील काही विशिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती केवळ रामगिरीवर करण्यात आल्याची माहिती मिळाली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून सुरू होणार असून परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे त्यांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या व्यवस्थेची माहिती घेतली असून तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रामगिरीवरीच्या व्यवस्थेत कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रोज कामाचा आढावा घेतला जात असल्याचे सांगण्यात येते. दरवर्षी रामगिरीवर जी व्यवस्था असते तशीच व्यवस्था यंदाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानांवर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जात आहे. यावेळी खर्चामध्ये कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात मात्र रंगरंगोटी, सजावट आणि गेल्यावर्षी खरेदी केलेले बंगल्यातील सामान बदलण्यासाठी कोटय़वधी रुपयाचा खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकीर्दीत उपराजधानीत होणारे विधिमंडळाचे तिसरे हिवाळी अधिवेशन आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुका असल्याने या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे.
रामगिरीची तयारी शेवटच्या टप्प्यात असून मुख्य प्रवेशद्वारातून महत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. परिसरात असलेल्या दोन्ही लॉन सुशोभित करण्यात येत असून बागेमध्ये विविध प्रकारची फुले आणि शोभेची झाडे लावण्यात आली आहे. रामगिरीसमोरील सर्वच मार्ग बंद करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती सोडून अन्य व्यक्तींना वेकोलिच्या मैदानावरील हेलिपॅडकडून प्रवेश देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांना या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. बंगल्याच्या आवारात पाच खोल्या बांधण्यात आल्या आहेत, त्यापैकी एका खोलीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा