देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या ‘लालबागचा राजा’ यंदा दाक्षिणात्य धाटणीच्या मंदिरात विराजमान होणार आहे. आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिरातील कलाकुसरीचा अवलंब करून एक आगळेवेगळे दाक्षिणात्य मंदिर लालबागच्या मार्केटमध्ये साकारण्यात येत आहे. ताशीव दगडांमध्ये बारीक नक्षीकाम केलेल्या आकर्षक मंदिरांसाठी दक्षिण भारत प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथील श्री तिरुपती बालाजीचे मंदिर हे त्यापैकीच एक. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील कलाकुसर असलेले भव्य प्रवेशद्वार, हत्ती-घोडय़ांच्या प्रतिमा असलेले खांब, गाभाऱ्यातील नक्षिकामांचा उत्तम नमुना असलेल्या कमानी उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे आणि त्यांचे सहकारी हे मंदिर साकारत आहेत. तसेच दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये दर्शनीभागात दृष्टीस पडणाऱ्या गरुडाची २५ फुटी भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असून ती प्रवेशद्वारावरच पाहण्यास मिळणार आहेत.
लालबाग मार्केटजवळ ४५ फूट उंच आणि ५० फूट रुंद नक्षीकाम केलेले आकर्षक असे मुख्य प्रवेशद्वार आणि चिवडा गल्ली आणि गरमखाडा येथे आकर्षक अशी दोन प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. या प्रवेशद्वाराच्या खांबांवर विविध देवदेवतांच्या मूर्तीही पाहायला मिळणार आहेत. ‘लालबागच्या राजा’ला साजेशा गाभारा उभारण्यात येत असून त्याला तिरुपती मंदिरातील गाभाऱ्याचा ‘लूक’ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
लालबागमध्ये तिरुपती बालाजीचे मंदिर साकारण्याचा विचार होता. परंतु ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी उसळणारी भाविकांची गर्दी, त्यांची सुरक्षितता, उपलब्ध जागा याचा विचार करता येथे या मंदिराची प्रतिकृती साकारणे शक्य नाही. त्यामुळे या मंदिराशी मिळती जुळती प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील ठळक वैशिष्टय़े उभारली जात आहेत. सजावटीमध्ये उभारण्यात येणारे खांब हे ‘रस्टी गोल्ड’, तर इतर दर्शनी भाग ‘रिच गोल्ड’ रंगाने सजविण्यात येणार आहे. त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती जशीच्या तशी साकारली नसली तरी भाविकांना तिरुमाला येथील मंदिरात गेल्यासारखे भासेल, असे धबडे यांनी सांगितले.
‘लालबाग राजा’च्या दर्शनासाठी दरदिवशी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंडळाने विविध सुविधांनी युक्त असे दोन मोठे मंडप उभारले आहेत. एका मंडपात मुखदर्शनासाठी येणारे भाविक, तर दुसऱ्या मंडपात नवस फेडण्यासाठी येणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून स्वयंसेवकांची कुमक सज्ज करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा