केंद्र शासन पुरस्कृत योजनेतंर्गत ‘कलाग्राम’साठी तालुक्यातील मौजे गोवर्धन येथील दोन हेक्टर जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास देण्याची कार्यवाही प्रशासनातर्फे बुधवारपासून सुरू करण्यात आली. ग्रामपंचायतीने हरकत घेतली असल्याने आणि ग्रामस्थांचा विरोध असल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारीही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे सुरू राहणार असून याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
आगामी कुंभमेळयाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गोवर्धन शिवारातील काही भाग आरक्षित केला आहे. या जागेत देशातील विविध प्रांतातील कलाकुसरीचे नमुने, त्या कलेविषयी कार्यशाळा, चर्चा, परिसंवाद घेण्यासाठी जागा असे विविध उपक्रमांचे नियोजन आहे. या दृष्टीने विकास महामंडळाच्या वतीने जागा ताब्यात घेण्यासाठी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र ही जागा गावातील विकास कामांसाठी मिळावी याकरिता गोवर्धन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा केला. ग्रामस्थांनी गट नंबर सातच्या जागेमध्ये क्रीडांगण, व्यायामशाळा, वाचनालय, गावठाण विस्तार करण्यासाठी २००९ पासून ते आतापर्यंत वारंवार संबंधितांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.  
ही जागा गायरान व गुरे चरणासाठी शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे ती जागा प्रशासनाने ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावाबरोबरच ग्रामसभेचा ठराव असणे बंधनकारक असताना सदर जागा संपादन प्रक्रियेत संबंधितांनी कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही. ग्रामपंचायतीने तसा ठरावही दिलेला नाही, असे पिराजी जाधव यांनी सांगितले. त्यामुळे ही जागा कलाग्रामकरिता हस्तांतरीत्करण्यास आपला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी महामंडळाच्या वतीने जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता ग्रामस्थांनी जागेच्या परिसरात मानवी साखळी तयार करून अटकाव केला. ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहता महामंडळाच्या वतीने काही काळासाठी ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.