चित्री प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा परस्पर लिलाव केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत जमिनीचे मूळ मालक विनय भालचंद्र सबनीस यांनी राष्ट्रीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने कागदोपत्री परस्पर लिलाव करून जमीन घशात घालण्याचा प्रकार सुरू केल्याची तक्रार केली होती.
आजरा तालुक्यातील सावरवाडी येथील गट नंबर ४३ (अ) मधील २० एकर जमीन सबनीस परिवाराने १९९८ मध्ये स्वेच्छाकब्जाने चित्री प्रकल्पाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिली होती. शहरानजीक असणारी ही जमीन दिल्याने पुनर्वसनाच्या कामाला गती आली होती. या २० एकर पैकी ८ एकर जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्यातआली. जोपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होत नाही, तोपर्यंत संपादित केलेल्या जमिनीची विल्हेवाट लावता येत नाही. तालुक्यातील विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी असताना पुनर्वसन कार्यालय १५, २/२३३/२०१० च्या आदेशान्वये युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी निर्मळे (पारेवाडी)यांना उर्वरित १२ एकर जमीन केवळ ५ लाख ५९ हजार ५०० रुपयांना लिलावात दिल्याचा आदेश काढण्यात आला असल्याचे सबनीस यांनी सांगितले.     
प्रकल्पाग्रस्तांसाठी संपादित करण्यात आलेली जमीन परस्पर लिलाव करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी किंवा पुनर्वसन अधिकाऱ्यांना आहे काय, असा सवालही केला आहे. या लिलाव प्रक्रियेची कोणतीही नोटीस मूळ मालकांना न देता थेट कब्जाची नोटीस जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी लागू केली आहे. याबाबत आपण गडहिंग्लज येथील न्यायालयात दावा दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा