लोकशाही बहिरी झाली आहे. कोणावर कशाचाच परिणाम होत नाही. अस्वस्थ वर्तमानात खदखद व्यक्त करण्यासाठी लोकशाहीत मिळालेले माध्यम म्हणून लेखनाकडे बघतो, या शब्दांत ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांनी लेखनप्रेरणेचे गमक ‘लोकसत्ता’शी उलगडून सांगितले.
या नाटकामुळे राजकुमार तांगडे या नव्या दमाच्या नाटककाराने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. लहानपणापासून नाटकाची आवड जोपासणारे तांगडे वर्तमानावर थेट भाष्य करतात. परिस्थिती बिकट असली तरी आपण निराश नाही, असे ते आवर्जून सांगतात. नजीकच्या काळात समाजजीवनात मोठी उलथापालथ होईल आणि त्यातून नवे काही साकारेल, असा आशावादही त्यांच्या ठायी आहे. असंख्य प्रश्नांनी गांजलेल्या भूमीवर घट्ट पाय रोवून उभा राहणारा नाटककार म्हणून तांगडे यांचे नाव चर्चेत आहे.
जालना जिल्ह्य़ातील जांबसमर्थ हे तांगडे यांचे गाव. नाटकाची आवड लहानपणापासून असली, तरी आजूबाजूचे सहजस्पर्शी विषय नाटकासारख्या माध्यमातून हाताळू शकतो, ही जाणीव झाल्यानंतर त्यांच्यातील अस्वस्थ कलावंताचा प्रवास सुरू झाला. अनेक खाचखळगे असले तरी त्यांचा प्रवास सुरू आहे. लिहिलेले कोणाला वाचून दाखवावे आणि मार्गदर्शन घ्यावे, अशी स्थिती नव्हती. जगणं समजून सांगणारे अनेकजण भेटले. पण लेखनात कोणी गुरू भेटला नाही. आपण लिहीत जावे, मांडत जावे या शब्दांत राजकुमार आपल्या लेखनातील पहिलेपणाची अनुभूती सांगतात.
ग्रामीण भागातील ज्वलंत समस्या, शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नसलेले मोल, कर्जबाजारीपणापासून नापिकीपर्यंतचे अरिष्ट असे नाना विषय राजकुमार यांच्या भोवताली होते. सन १९९८ मध्ये त्यांनी ‘काय दिलं स्वातंत्र्याने’ हे नाटक लिहिले. ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांनी या नाटकातून हात घातला. तत्पूर्वी १९९५मध्ये ‘बहीण माझी प्रीतीची’ हे नाटक लिहिले होते. त्यात हुंडाबळीचा विषय होता. मध्यंतरी संपूर्ण ग्रामीण भागात विजेचे संकट ओढवले होते. केवळ रात्रीचा अंधारच नाही तर जगण्यापुढेच अंधार भारनियमनामुळे निर्माण झाला. उभी पिके डोळ्यादेखत जळत होती. शेतीला पाणी देणे कठीण झाले. शेतकऱ्याची अवस्था भीषण होती. हा विषयसुद्धा तेवढाच स्फोटक आणि जिवंत होता. ‘आकडा’ हे नाटक पु. ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत झळकल्यानंतर तांगडे यांच्या नाटय़प्रवासाला खरी सुरुवात झाली. या नाटकाने त्यांना मुख्य प्रवाहात आणले. त्याचे १७१ प्रयोग झाले.
‘हितशत्रू’, ‘आमची शाळा’, ‘जित्याची खोड’ या एकांकिका त्यांनी लिहिल्या. त्यानंतर ‘श्वेतांगा’ हा त्यांनी लिहिलेला लघुपट नंदू माधव यांनी दिग्दर्शित केला. कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा त्यांनी लघुपटातून मांडली. मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी कसे चटके सहन करतो, त्याची तीव्रता ‘श्वेतांगार’मधून दिसून आली. या लघुपटातून तांगडे यांच्या प्रतिभेचा आणखी एक पैलू उघड करणारा ठरला. ‘कान्स फिल्म्स फेस्टिव्हल’मध्ये गेलेला तो पहिला मराठी लघुपट होता. या यशाने राजकुमार यांच्या लेखनाची नोंद सर्वत्र घेतली जात होती. याच वेळी त्यांचा रंगभूमीवर काही प्रयोगशील घडवू पाहऱ्यांशी संपर्कही वाढत गेला. ‘दलपतसिंग येती गावा’ ही अशाच संपर्कातून घडलेली निर्मिती. मकरंद साठे यांनी लिहिलेल्या पटकथेचे नाटय़रूपांतर राजकुमार तांगडे यांनी यानिमित्ताने केले. या नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग झाले. माहितीच्या अधिकाराची जाणीव जागृती घडविणारे हे नाटक.राजकुमार तांगडे हे नाव चर्चेत आले ते ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे. गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजीमहाराजांना जाती-धर्मात अडकविण्याचा जो प्रयत्न राजकारण आणि समाजकारणात सुरू होता, त्याला या नाटकाने अक्षरश: सुरूंग लावला. रयतेचा राजा ही छत्रपती शिवाजीमहाराजांची खरी ओळख तांगडे यांनी नाटकाच्या माध्यमातून अधोरेखित केली. हे नाटक लिहिणे त्यांच्यासाठी एक जोखमीचे काम होते. ज्या पद्धतीने या नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी होत आहे, त्यावरून तांगडे यांच्या लेखनाने ती जोखीम निश्चित पेलून धरली, असेच म्हणता येईल. या नाटकाचे १०८ प्रयोग झाले. येत्या १८ जानेवारीला नवी दिल्ली येथेही हा प्रयोग होणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्यावतीने भारत रंग महोत्सवात त्याचा प्रयोग होईल. राज्यातून ‘सत्यशोधक’ आणि ‘शिवाजी अंडरग्राउंड’ या दोन नाटकांची निवड झाली आहे.राजकुमार तांगडे यांचा हा नाटय़प्रवास त्यांच्याकडून खूप अपेक्षा बाळगणारा आहे. या वाटेवर उमेद वाढवणारी आणि कामाची यथोचित नोंद घेणारी काही झोकदार वळणेही त्यांच्या प्रवासात आली. वसंत सोमण स्मृती पुरस्कार, शिवार साहित्य प्रतिष्ठानचा शेतकरी साहित्य पुरस्कार, भारतातल्या पाच रंगकर्मीना दिल्या जाणाऱ्या एक लाख रुपयांच्या विनोद दोषी फेलोशिपसाठीची निवड अशा माध्यमातून राजकुमार यांच्या कामाची नोंद घेतली गेली आहे.