महाबळेश्वर पाचगणी परिसरात डोंगर टेकडय़ांचे उत्खनन, सपाटीकरण आणि बेसुमार वृक्षतोड करून धनदांडगे आणि त्यांचे दलाल नवीन बांधकामे करण्याचे काम सुरू आहे. यामुळे स्थानिक भौगोलिक रचनेवर परिणाम झाला असून जमीन, रस्ते, घरे खचणे, भेगा पडणे असे प्रकार घडू लागले आहेत.
निसर्ग आणि नैसर्गिक परिस्थिती बदलवण्याचे काम सध्या सुरू आहे. याला वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
पाचगणी येथून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणेश पेठ या परिसरातील रस्त्यांना व घरांना भेगा पडल्याचे दिसून आले. यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. अनेक भागातील घरांना तडे गेले. या वेळी या भागात मुसळधार पाऊस सुरू होता. गणेश पेठ ही रुईघर (ता. जावळी) या गावाची वस्ती आहे. येथून जाणारा काटवली घाटरस्ताही धोकादायक झाला. या रस्त्यालाही भेगा पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी महसूल यंत्रणांनी पाहणी करून याबाबतच अहवाल शासनास पाठविला आहे.
दोनतीन वर्षांपूर्वी पावसाळ्यातच भिलार आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनी खचत होत्या. त्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. गणेश पेठ येथेही काही घराच्या भिंतींना तडे गेल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले.
मुळातच पाचगणी-महाबळेश्वर परिसर डोंगरावर, डोंगर रांगांवर आणि टेकडय़ांवर वसलेला आहे. सध्या अनेक धनदांडगे लोक स्थानिक दलालांना हाताशी धरून या परिसरात बेसुमार वृक्षतोड आणि उत्खनन करीत आहेत. त्यांना स्थानिक महसूल यंत्रणेचा पाठिंबा आहे. त्यांना हाताशी धरून जंगल व वृक्षराजीचा फायदा उठवत काही उत्खनन करण्यात येते. पाण्याचे प्रवाह बदलणे, बंद करण्याचे काम सुरू आहे. सहज या परिसरात फेरफटका मारला तरी अनेक टेकडय़ा जमीनदोस्त करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय वरदहस्त, कुरघोडय़ा करण्यासाठी या परिसरात येऊ घातलेल्या धनदांडग्यांना सर्व प्रकारची सेवा देऊन जमीन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या जमिनीवर मोठमोठाले बंगले, रो हाउसेस, हॉटेल्स उभी राहात आहेत. कित्येकदा स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही अशी मंडळी करत आहेत. शासनाचे या कामी अनेक कडक नियम आहेत. मात्र शासनातीलच लोक पळवाटा काढून सर्व कामांना हिरवा कंदील दाखवत आहेत. त्यामुळे स्थानिक व भांडवलदारांमधील दरी रुंदावत आहेत. दलाल मालामाल तर जमीनमालक कंगाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा सपाटीकरण, उत्खननामुळे जमिनीत फेरबदल होत आहेत. पाण्याचे प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच या ठिकाणच्या भौगोलिक रचना अडचणीत येत आहेत. याबाबत शासकीय पातळीवर कठोर भूमिका घेत यापुढे निर्णय घेण्याची गरज आहे. नाहीतर कधीतरी येथेही भूस्खलन, जलप्रवाह अशा घटना मोठय़ा प्रमाणावर घडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा