मोठय़ा संघर्षांतून खंडकरी शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीला जमिनी वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तरी अद्याप गावातच जमिनी उपलब्ध होण्यास अधिकारी पातळीवर अडचणी येत आहेत. त्यामुळे आता हे निर्णय पुण्यात बसून घेण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंबंधी आपण मागणी करणार असल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती व अडचणी जाणून घेण्यासाठी ते सावळीविहीर खुर्द आणि बुद्रुकच्या दौऱ्यावर आले त्या वेळी  ते बोलत होते. त्यांच्यासमवेत सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, जिल्हा परिषदेच्या सदस्य वैजयंती धनवटे, पंचायत समिती सदस्य बेबीताई आगलावे, प्रांताधिकारी सुहास मापारी, गटविकास अधिकारी कमलाकर रनदिवे, नायब तहसीलदार राहुल कातोडे, आत्मा कमिटीचे आम्ले, तालुका कृषी अधिकारी रामभाऊ गायकवाड, अप्पासाहेब जमधडे, बबनराव पवार, साहेबराव जपे, संगीता वाघमारे, किसनराव क्षीरसागर, सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
विखे म्हणाले, की खंडकऱ्यांना जमिनी या त्यांच्या गावातच मिळाल्या पाहिजेत. मात्र तसे होताना दिसत नाही. पुणतांबा येथेही शेतकऱ्यांना दुसऱ्या जमिनी दाखविण्यात आल्या. गावातच जमिनी उपलब्ध असताना शेतकरी बाहेर जातीलच कसे असा सवाल करून शहरालगतच्या जमिनीवर डोळा ठेवून अधिकारीच खंडकऱ्यांना चांगल्या जमिनींपासून वंचित ठेवत असतील तर वेगळा विचार करून वाटपाचे अधिकार आता त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याबाबतचा विचार करावा लागेल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून, महसूलमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे.
दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. सरकार जनतेला आधार देण्यासाठी कटिबद्ध आहे. पिण्याच्या पाण्याला आणि पशुधन वाचवण्यासाठी छावण्यांना प्राधान्य दिले जात असून, फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाने आता सर्व नियम शिथिल केले आहेत. या कामासाठी केंद्राकडून ४०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. लवकरच आणखी ४०० कोटी रुपये मिळतील अशी माहिती विखे यांनी या वेळी दिली. उपस्थित नागरिकांनी रेशन आणि पिण्याच्या पाण्याबाबतच या वेळी जास्त मागण्या या वेळी विखे पाटील यांच्याकडे केल्या गोदावरी कालव्याखाली पिण्याच्या पाण्याचे तलाव न भरल्याने पुढचे आठच दिवस पाणी पुरणार असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी आवर्तन मिळाले तरच ५० ते ६० वर्षे जुन्या फळबागा टिकू शकतील असे विखे म्हणाले.
दुष्काळाची भीषणता वाढत असल्याने चोऱ्यांचे प्रकरणही वाढले आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आता गावातील तरुणांनी ठिकठिकाणी ग्रामसुरक्षारक्षक दलाची स्थापना करावी अशी सचना विखे यांनी या वेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा