कोकणात जमिनी लाटणारे राजकीय नेते आता मराठवाडय़ातील उस्मानाबादसारख्या मागास जिल्ह्यातही कोटय़वधींच्या जमिनी खरेदी करू लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद तालुक्यातील जवळे (दु) व आळणी शिवारात १५० एकर जमीन खरेदी केली. खरेदीखतात मूल्यांकन कमी दाखवून जवळपास सव्वा कोटी मुद्रांक शुल्क बुडविले. विशेष म्हणजे खरेदीदारांचा व्यवसाय शेती व घरकाम दाखविला आहे. शेती व घरकाम करणारी व्यक्ती कोटय़वधींची जमीन कशी खरेदी करू शकते, असा सवाल करीत सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी मलिक व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली.
उस्मानाबाद तालुक्यातील जवळा(दु) शिवारातील गट क्र. २८३/२ (२४.६६ हे.), गट क्र. २८३/४ (१९.२५ हे.), गट क्र. २८३/५ (१८.२० हे.), तसेच आळणी शिवारातील गट क्र. ३३९ (४.२७ हे.) अशी ५९.८१ हेक्टर जमीन पुण्यातील बाणेर येथील वसंत भाऊसाहेब मुरकुटे, नंदा वसंत मुरकुटे, संदीप वसंत मुरकुटे, कल्पना संदीप मुरकुटे, सूर्यकांत वसंत मुरकुटे व रूपाली वसंत मुरकुटे यांच्या मालकीची होती. ही जमीन गेल्या २३ डिसेंबरला मुरकुटे परिवाराने मलिक यांचे कुटुंबीय महेजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, बुश्रा संदुश फराज, अमीर नवाब मलिक, नीलोफर समीर खान, फराज नवाब मलिक (सर्व राहणार २१८, सी २, तळमजला नुरमंजिल, कुर्ला पश्चिम मुंबई) यांनी २ कोटी ७ लाख रुपयांना खरेदी केली आहे.
खरेदी करणारे नवाब मलिक यांचे कुटुंबीय आहेत. त्यांच्या वतीने फराज नवाब मलिक यांना खरेदी अधिकाराचे मुखत्यारपत्र करून दिले होते. त्यानुसार फराज मलिक यांनी खरेदीवर सही केली आहे. जमिनीचे मूल्यांकन २ कोटी ७ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. त्यावर ८ लाख ४० हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क फराज मलिक यांनी भरले.
वास्तविक, या जमिनीचे शासकीय दराने होणारे मूल्य ३ कोटी २९ लाख ६२ हजार ९८० रुपये एवढे आहे. मलिक परिवाराने १ कोटी २२ लाख रुपये मूल्यांकन कमी दाखवून सरकारचे मुद्रांक शुल्क बुडविले. मूल्यांकन करताना अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव वापरून हा प्रकार केल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी पत्रकार बैठकीत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा