पालिकेच्या डोंबिवलीतील ‘ग’ प्रभाग क्षेत्रातील टावरीपाडा, बालाजी दर्शन परिसरातील अनधिकृत चाळींना देण्यात आलेल्या ४८ अनधिकृत नळजोडण्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडून टाकल्या होत्या. आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या आदेशावरून ही तातडीची कारवाई करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच भूमाफिया आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयातील काही झारीतील शुक्राचार्यानी संगनमताने या नळजोडण्या पुन्हा जोडल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे.
कोपर पूर्व रेल्वे स्थानक, बालाजी दर्शन परिसर, टावरीपाडा परिसरात एका नगरसेविकेच्या पतीने अनधिकृत चाळींचे ‘नवनिर्माण’ केले आहे. पारचेनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ‘नवनिर्माण’ नगरीत भूमाफिया, काही नगरसेवक, त्यांचे समर्थक, स्थानिक गावगुंड यांच्या संगनमताने खारफुटीवर मातीचे भराव टाकून अनधिकृत चाळी उभारण्यात येत आहेत. आयरेगाव परिसरातील नागरिकांना गणपतीचे विसर्जन करण्यासाठी एक तलाव आहे. या तलावाच्या जागेवरही भूमाफियांनी चाळी बांधल्या आहेत. स्थानिक नगरसेवकाने याबाबत पालिका आयुक्तांना तक्रारी केल्या आहेत. पण पालिका या जमिनीचे सर्वेक्षण करावे लागेल, अशी भूमिका घेऊन भूमाफियांचे समर्थन करीत असल्याचे लोकप्रतिनिधी, नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातील काही भूमाफियांवर ‘ग’ प्रभागाने एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले आहेत. मग तलावाच्या जागेवर अनधिकृत चाळी उभारणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाईची टंगळमंगळ का केली जात आहे, असे या भागातील जाणकार नागरिकांचे प्रश्न आहेत.
‘नवनिर्माण’ नगरीला ‘ग’ प्रभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे. फक्त कारवाईचा देखावा दररोज उभा केला जात असल्याचे सांगण्यात येते. या भागातील आयरेगाव स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता भूमाफियांनी बंद करून टाकला आहे. ही स्मशानभूमी नागरी वस्तीत आल्याने ती जागाही भूमाफियांकडून हडप होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत ग प्रभागातील प्रभाग अधिकारी चंदुलाल पारचे, त्यांचा सेवक लिपिक राजेंद्र साळुंखे यांची या प्रभागातून बदली केली जात नाही तोपर्यंत पारचेनगरी, नवनिर्माण नगरी अनधिकृत चाळींनी फुलून जाणार असल्याची टीका नागरिकांकडून, पालिकेतील काही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा