महापालिकांतर्गत शहरातील विविध भागांतील दोन भूखंडाच्या मध्ये मलनि:सारणासाठी सोडण्यात आलेल्या जागा ३० वर्षांसाठी भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शहरातील बिल्डर्स आणि नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रारंभी धरमपेठ, काँग्रेसनगर, पाचपावली आणि जाटतरोटी या अभिन्यासातील सफाई गल्ली निश्चित केल्या होत्या. आता संपूर्ण शहरासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यापासून महापालिकेला चार वर्षांत ४०० कोटी रुपये उत्पन्नाची शक्यता असल्याची माहिती सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी दिली.
शहरात जुन्या अभिन्यासात दोन भूखंडाच्या मागील भागात मलनि:सारणासाठी सफाई गल्ली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कालांतराने खुल्या गटार नालीचे रूपांतर भूमिगत नालीत झाल्यामुळे या सफाई गल्लीची गरज नसल्यामुळे त्या जागेवर भूखंडधारकांकडून किंवा असामाजिक तत्त्वांनी अतिक्रमण केले.
शहरातील अशा जागा ३० वर्षांंसाठी त्या संबंधीतांना अटी व शर्तीवर लीजवर देण्यात येणार आहे. सफाई गल्लीच्या रुंदीपैकी अर्धा अर्धा भाग संलग्नित दोन्ही बाजूच्या भूखंडधारकांना समप्रमाणात विभाजन करून देण्यात येईल.
या जागेची किंमत शासनाच्या नगररचना विभागाचे वर्तमान वर्षांत ‘रेडिरेकनर’ दराच्या दुप्पट दर आकारून ती रक्कम भूखंडधारकांकडून वसूल करण्यात येईल.
तसेच यावर २ टक्के भूभाटक आकारण्यात येईल. सफाई गल्लीच्या जागेवर कोणतेही स्थायी किंवा अस्थायी बांधकाम करता येणार नाही. त्या ठिकाणी बांधकाम केल्यास ते तोडण्यात येईल. या जागेचा वापर खुल्या प्रयोजनासाठी म्हणजे उद्यान, पार्किंग आदीसाठी करण्यात यावा. त्या ठिकाणी असलेल्या भूमिगत पाईपलाईनला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जागेच्या चटई क्षेत्र निर्देशकाचा वापर मूळ भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या बांधकामासाठी करण्यात येईल.
३० वर्षांंसाठी लीजवर ही जागा देण्यात येणार आहे आणि त्यापुढे नूतनीकरण करावयाचे असल्यास त्याचा अधिकार महापालिकेस राहणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेचा अधिकारही महापालिकेकडे राहणार आहे. अशा जागेसाठी महापालिकेकडे अनेक अर्ज पडले असून त्यांचा प्रथम विचार करण्यात येईल.
एखाद्या दुकानाच्या शेजारी असलेली सफाई गल्लीची जागा भाडेपट्टीवर मंजूर करताना रेडिरेकनर दरानुसार त्यावर कर आकारण्यात येईल आणि त्यावर २ टक्के भूभाटक घेण्यात येईल. शहरात २ लाख ७ हजार ६२५ चौरस मीटर सफाई गल्लीचा समावेश आहे, असेही तिवारी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा