डोंबिवलीत महापालिकेच्या आरक्षित भूखंड तसेच सरकारी जमिनींवर अनधिकृत चाळी उभारून ‘तृप्त’ झालेल्या भूमाफियांनी आता आपला मोर्चा कल्याण परिसरातील मोहने, आंबिवली, अटाळी, शहाड, वंझारपट्टी, बंदरपाडा या भागांकडे वळविला आहे. या भागात तीन हजाराहून अधिक बेकायदा बांधकामे सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
भूमाफिया नगरसेवक, महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही अनधिकृत बांधकामे केली जात आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. टिटवाळा, मांडा भागात भूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. वनविभाग, सरकारी जमिनीवर या चाळी उभारण्यात येत आहेत. अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा अहवाल या भागाचे आरोग्य निरीक्षक सुनील जाधव यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना दिला आहे. पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने या बांधकामांवर कारवाई करणे शक्य होत नाही. कारवाई सुरू असताना भूमाफियांकडून कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात येते. अशा प्रकारांमुळे या बांधकामांना एक प्रकारे राजाश्रय मिळत असल्याचे चित्र आहे. यासंबंधी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मोहने परिसरातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. याबाबतचा अहवाल आल्यानंतर ही सर्व बांधकामे तोडण्याचा एक मोठा कार्यक्रम घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. कारवाई करण्यास पोलीस बंदोबस्त वेळीच मिळत नसल्याने काही अडथळे येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.