पनवेल तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने आता काही महाभागांनी नदीच्या पात्रावर भराव टाकून त्यावर दावा करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. शिवकर गावालगत वाहणाऱ्या चिखले नदीचे पात्र लहान करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. पनवेल ते पळस्पा या मार्गावरून ओएनजीसी कंपनीच्या कार्यालयाजवळ हा भराव थेट नदीपात्रात केला जात होता. याबाबत पनवेलच्या महसूल विभागाने कारवाई करून हा प्रकार उजेडात आणला.
चिखले गावाहून आलेल्या या नदीच्या पाण्याचा संगम करंजाडे येथे गाडी नदीसोबत होतो. कोळखे आणि काळुंद्रे या दोन्ही गावांच्या वेशीवर ही नदी वाहते. या नदीच्या पात्रात कोळखे बाजूकडून दगडांचा भराव तसचे काळुंद्रे बाजूकडून मातीचा थेट भराव केला जात होता. या भरावामुळे मोहो-शिवकर यासारख्या पनवेलच्या पूर्वेकडील गावांतील लहान पुलांवर पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संतोष पाटील यांनी नदीपात्रात प्रकाश म्हसकर याला मातीचा भराव टाकताना पकडल्याची माहिती दिली. म्हसकर यांनी ४०७ ब्रास मातीचा भराव येथे टाकल्याचे महसूल विभागाला आढळले. याबाबत रीतसर पंचनामा करून म्हसकरविरोधात तहसीलदार कार्यालयात चौकशी सुरू आहे. हा भराव प्रकाश म्हसकर का करत होता हे अद्याप समजू शकले नाही.

 

Story img Loader