नागपूर शहरात मेट्रो रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानकांसाठी जागेची गरज भासणार असून या जागा मिळवणार कशा, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.    आवश्यक तेवढय़ा जागांच्या अधिग्रहणामुळे प्रकल्प लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आल्यानंतर नागपूरकरांना हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, याची उत्सुकता लागलेली आहे. मेट्रो सुरू होणार याची घरोघरी चर्चा सुरू झाली आहे. नागपूरची लोकसंख्या सध्याच सुमारे २५ लाखांवर पोहोचली आहे. शिवाय १२.३७ लाख वाहने रोज रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी १०.३२ टक्के दुचाकी आहेत. ६४.८१ टक्के लोक खाजगी वाहनांचा वापर करतात. ३३.७५ टक्के लोक दुचाकी वापरतात. ३१.१६ टक्के लोक कार वापरतात. या प्रकल्पासंबंधी २००८मध्ये एल अँड टी व रेंबॉल्ड कंपनीने केलेल्या सव्‍‌र्हेक्षणातील ही आकडेवारी आहे. त्यानंतर लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत तीव्र गतीने वाढ होत आहे. त्यामुळे नागपूर शहराला मेट्रोची गरज आहेच. यासंबंधी सखोल प्रकल्प अहवाल तयार होऊन तसेच महाराष्ट्र शासनाकडे पाठवून नासुप्रने पहिले पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळून वेळेत काम सुरू होईल, यात शंका नसली तरी जागेची अडचण निर्माण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक- मेट्रो डेपो या मार्गावर १८ तर प्रजापतीनगर- लोकमान्यनगर या मार्गावर १९ स्थानके निश्चित करण्यात आले आहेत. सध्या निश्चित केलेल्या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी सुमारे दहा मीटर उंचीचे स्तंभ उभारून त्यावर मेट्रोसाठी काँक्रिटची स्लॅब टाकून त्यावर रेल्वे ट्रॅक राहील. हे दोन्ही मार्ग दुहेरी राहतील, असे सांगण्यात आले. त्यासाठी निवडलेल्या रस्त्यांवरील जागा पुरेलही. मात्र, स्थानकांसाठी फलाट म्हणजेच पर्यायाने काही फूट लांब व रुंद जागा लागेल. ऑटोमोटिव्ह चौक- मेट्रो डेपो या मार्गावर गड्डीगोदाम, झिरो माईल्स, सीताबर्डी, देवनगर, मयुरेश अपार्टमेंट तसेच प्रजापतीनगर- लोकमान्यनगर या मार्गावरील नेताजी मार्केट, झाशी राणी चौक या स्थानकांसाठी जागेची अडचण भासू शकते. मुंजे चौकात या दोन्ही मार्गाचे जंक्शन आहे. किमान क्रासिंग असले तरी दोन्ही मार्गाची स्थानके स्वतंत्र ठेवावी लागतील. बारा डब्यांची गाडी राहणार असल्याने तेथेही दोन्ही बाजूंनी लांब व विस्तीर्ण जागा लागेल. या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत.
कमीत कमी जमीन लागेल तसेच इमारतींची कमीत कमी तोडफोड होईल, या दृष्टीने मार्ग आखण्यात आला आहे. हिंगणा मार्ग परिसरात संरक्षण खात्याची तसेच उत्तर भागात अशा दोन जागा अधिग्रहित कराव्या लागतील, असे आधीच स्पष्ट करण्यात आले असले तरी या स्थानकांसाठी जागा कशी मिळवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंजुरी वेळेवर मिळून कामही वेळेवर सुरू झाले तरी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणासाठी वेळ लागून परिणामी प्रकल्पही लांबू शकतो, असे अनेकांना वाटते.

Story img Loader