शहरातील काही लँडमाफियांनी खरेदी-विक्री व्यवहारात पलटी पद्धत रुढ करून भाव गगनाला भिडवले. यात अनेकांनी मोठा नफा कमविला. मात्र, गेल्या वर्षभरापासून जमिनीचे व्यवहार बरेच थंडावल्याने अनेकांचे जमीनखरेदीत पैसे अडकले आहेत. सध्या तरी या व्यवसायात मंदीचे पर्व आहे. गरजेपेक्षा मोठय़ा संख्येने फ्लॅटही तयार झाल्याने बांधकाम व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत.
काही जमीनमाफियांनी शहराच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात जमिनी खरेदी करून आपसात पलटी व्यवहाराची पद्धत सुरू केली. काही तासांत व्यवहार फिरवून लाखो रुपये उकळण्यास सुरुवात केल्याने खरेदी-विक्रीच्या धंद्यात अनेकांनी उडी घेतली. गरज नसताना मोठय़ा संख्येने प्लॉट, जमिनीचे सौदे करून नाममात्र रक्कम इसार म्हणून द्यायची व योग्य ग्राहक बघून जास्तीच्या भावात विक्री करून मालामाल व्हायचे, असा एकूण प्रकार आहे. त्यामुळे पलटीला तेजी आली. परिणामी पाचशे रुपये चौरसफूट किंमत असलेला प्लॉट दोन हजार रुपयांपर्यंत गेला, तर एक लाख रुपये एकरची जमीन काही कोटींत गेली.
सुरुवातीला या व्यवसायात अनेकांनी मोठय़ा प्रमाणात पसा कमावला. कमी कष्टात मोठा पसा मिळत असल्याचे लक्षात येताच दूधवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत अनेक लोक दलाल म्हणून या व्यवसायात उतरले. मात्र, वर्षभरापासून जमीन खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे काही रक्कम इसार देऊन सौदा केलेल्या प्लॉट व जमिनीचे व्यवहार पूर्ण होत नसल्याने लाखो रुपयांची बयाना रक्कम सोडण्याची वेळ अनेकांवर गुदरली आहे. काहींनी शहरच सोडून जाणे पसंत केले आहे. जमिनीला सोन्याचा भाव आणून स्वतचे उखळ पांढरे करून घेतलेले मोठे भूमाफियाही यात आहेत. पण सर्वाधिक अडकला तो नव्याने आणि व्यवसायाची पुरेशी माहिती नसताना व्यवहार करणारे एजंट.
तेलगाव रस्त्यावरील मोकळया जागेत सायंकाळी उशिरा जमीन खरेदी-विक्रीचा अक्षरश: बाजार भरत असे. पण आता भाव गडगडल्यामुळे घेतलेल्या जमिनी व प्लॉट खरेदीस कोणी फारसे तयार होत नसल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा