तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील १७ शेतकऱ्यांना २३ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही मिळाला नाही. या शेतजमिनी कुकडी कालव्यासाठी संपादीत करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांना हे पैसे द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दोन वर्षांंपूर्वीच दिला होता, तरीही महसूल विभागाच्या अजब कारभाराने या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा त्यांच्याच हक्कासाठी आंदोलन करण्याची वेळ आणली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी- कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे गावातील रविंद्र तनपुरे, जालिंदर तनपुरे, होसराव तनपुरे, सरस्वती तनपुरे, दिमाखराव तनपुरे, दशरथ तनपुरे, पितांबर तनपुरे, स्वप्निल तनपुरे, रंगनाथ शेडगे, अप्पासाहेब बागल, दिलीप तनपुरे, चंद्रराव तनपुरे, कृष्णाबाई तनपुरे, सुरेखा तनपुरे, अर्जुन गायकवाड, स्वाती काळे, ज्योती जाचक यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कृष्णा खोरे महामंडळाने सन १९८९ साली कुकडी कालवा खोदण्यासाठी अधिग्रहीत केल्या होत्या. त्यावेळी या जमिनीचे पंचनामेही भूमी अभिलेख विभागाने केले. त्यानंतर त्या जमिनी कृष्णा खोरे विभागाला हस्तंतरीत करण्यात आल्या. त्या जमीनीतून कालवा खोदण्यात आला. मात्र, या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. पैसे मिळत नाहीत म्हटल्यावर शेतकऱ्यांनी श्रीगोंदे न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर २५ नोव्हेंबर २०१० रोजी सर्व शेतकऱ्यांना जमीन संपादनाचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने नगर येथील जिल्हााधिकाऱ्यांना (विषेश भूसंपादन क्रमांक ३) दिला, मात्र अद्यापही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे उद्या (मंगळवार) हे सर्व शेतकरी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत आणि यावरही काही कार्यवाही झाली नाही तर न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल करणार
असल्याची माहिती रविंद्र तनपुरे
यांनी दिली.     

Story img Loader