१२५ वर्षांपूर्वीची तुकारामाची कविता त्यांच्या बोलीभाषेत निर्माण झाल्यामुळे तिला आज महत्व प्राप्त आहे. बुद्धांनी बोलीभाषेतून आपले चिंतन मांडले नसते तर म्यानमार ते भारत-श्रीलंकेपर्यंत बौद्धधर्माचे विस्तारीकरण झाले नसते. बोलीभाषेतून ह्रदयाचे संवाद दुसऱ्या ह्रदयापर्यंत पोहोचतात. शाहिरांनी सुद्धा बोलीभाषेचा वापर करीत प्रबोधनाला मनोरंजनाची सांगड घालून लोकभाषेला साद घालत लोकांच्या मनात खोलवर प्रभाव करीत जनजागृती केली. अशिक्षित असलेल्या बहिणाबाईंच्या कविता अहिराणी या लोकभाषेतूनच तयार साहित्यात शेण, शेत, ग्रामीण जीवनाच्या तत्वज्ञानांमुळे चिरंतर झालेली आहे. कोकणात कोकणी, मालवणी, विदर्भातील वऱ्हाडी, झाडीबोली, गोंडीभाषा, मराठवाडय़ात मराठवाडी, पारध्यांची भाषा, बंजाऱ्यांची भाषा आदि बोलीभाषेंचा प्रवाह अखेर ज्ञानभाषा मराठीला जाऊनच मिळतो. यामुळे या दोन्ही भाषेत मायलेकीचे नाते जाणवते, असे प्रतिपादन या विषयावरील परिसंवादात वक्त्यांनी केले.
विनायकराव कोतवाल सभागृह, भवभूति रंगमंदिर कन्हारटोली येथे आयोजित ६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनात ‘बोलींमुळेच मराठी साहित्य सकस झाले आहे’ या विषयावरील परिसंवादात िहगणघाटचे डॉ.गणेश चव्हाण यांनी लिखित नसलेली, पण समूहाने विशिष्ट क्षेत्रात जी भाषा बोलली जाते तिला बोलीभाष म्हणतात. ही लोकभाषा मौखिक परंपरा, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये जोपासत असतात. ही भाषा सतत बदलत असते, हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. रुढी-परंपरेचा अविष्कार आपण बोलीभाषेतूनच करत असतो. या बोलीभाषेतील नवनवीन शब्दच प्रमाण भाषेत वापरात येत असतात. बोलीभाषेचा स्वीकार केल्यास मराठी भाषाच अधिक समृद्ध होईल व त्यामुळे बरेच साहित्यही बोलीभाषेतूनच निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून वामनराव तेलंग, डॉ.इसादास भडके, डॉ.अशोक भक्ते, प्रा.अजय चिकाटे, डॉ.गणेश चव्हाण, डॉ.तीर्थराज कापगते उपस्थित होते. या परिसंवादातील अध्यक्षीय भाषणात वामनराव तेलंग म्हणाले, साठोत्तरी साहित्य व वाड्;मयाचे पडसाद समाजात उमटले. शिक्षणाचा प्रसार होत गेला. प्रत्येक समाजाचे लोक शिकत गेले. त्यामुळे मग त्यांना या साहित्याची जाण आली. आज झपाटय़ाने जग बदलत आहे. अशा काळात मराठी भाषेसमोर उभी राहणारी आव्हाने कशी पेलणार? बोलीभाषा समृद्ध आहे, पण कुठलीही बोलीभाषा ज्ञानभाषा झाली नाही. झाडीबोलीतील साहित्यशास्त्र कुठेतरी पोहोचेल म्हणून अंतराळातील शास्त्र, भौगोलिकशास्त्र, गणित, संगणकशास्त्र यापर्यंत कोणतीच बोलीभाषा पोहोचली नाही. यांचा ज्ञानभाषेतच अभ्यास करावा लागतो. याकरिता बोलीभाषेला आणखी प्रवास करावा लागणार आहे. साहित्यिकांनाही प्रयत्न करावा लागणार आहे. बोलीभाषेचे ज्ञान शब्दकोषांमध्ये आले पाहिजे. मराठीतून याबाबतचे प्रयत्न विद्यापीठातून चालविले गेले पाहिजे. याकरिता मानसिकरित्या तयारी करावी लागणार आहे. यात साहित्यिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान त्यांनी केले. या परिसंवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रसन्नजीत गायकवाड यांनी, तर आभार संगीता निगुळकर यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा