पालकांचा विरोधाचा ‘आवाज’ वाढल्याने शाळेच्या ‘विकास निधी’साठी (डेव्हलपमेंट फंड) पैसे जमा करणे ही मुंबईतील शाळांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. म्हणूनच बोरिवलीच्या एका शाळेने विकास निधी जमा करण्यासाठी एक नामी शक्कल शोधून काढली आहे.बोरिवलीच्या लिंक रोडला लागून असलेल्या डॉन बॉस्को या शाळेला वाढीव तुकडय़ा आणि कनिष्ठ महाविद्यालय सामावण्यासाठी नवी इमारत बांधायची आहे. त्यासाठी शाळेला काही ‘कोटी’ रुपये विकास निधीची गरज आहे. म्हणून शाळेने ज्युनिअर केजीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दहा अर्ज देऊ केले आहेत. आपले नातेवाईक, मित्रमंडळी, समाजातील दानशूर व्यक्ती यांच्याकडून मुलांनी (पर्यायाने पालकांनी) अर्ज भरून घ्यायचे आणि शाळेच्या नव्या इमारतीसाठी किमान १० हजार रुपये विकास निधी म्हणून उभा करायचा. अर्ज भरून पैसे उभारण्याची ही पद्धत तशी नवी नाही. पण, खरी गंमत तर पुढेच आहे. सर्व पालकांकडून अर्ज आल्यानंतर शाळा त्यांचा ‘लकी ड्रॉ’ काढणार आहे. यात ज्या पालकांचा नंबर लागेल त्यांना आयफोन, लॅपटॉप, वॉशिंग मशीन अशी बक्षीसे दिली जाणार आहे. शाळेसाठी निधी उभारणीच्या कामाला पालकांनी ‘मनापासून’ हातभार लावावा यासाठी शाळेने हा सर्व खटाटोप केला आहे. शाळेच्या निधी उभारणीच्या कामात काही पालकही आनंदाने सहभागी झाले आहेत, हे विशेष.
अतिरिक्त शुल्क किंवा विकास निधीच्या नावाखाली ‘वसुली’ करणाऱ्या शाळेच्या विरोधात पालकांनी दंड ठोकून उभे राहणे. मग पालकांनी एखाद्या पालक संघटनेच्या मदतीने शिक्षण विभागाकडे तक्रार करणे. शाळेने शुल्क किंवा डोनेशन न भरणाऱ्या पालकांच्या पाल्यांचा निकाल अडवून ठेवणे किंवा त्यांना वर्गात अपमानकारक वागणूक देणे. पुढे पुढे त्यांना शाळेच्या आवारात प्रवेश नाकारण्यापर्यंत शाळांची मजल मारणे, हे प्रकारही आता नित्याचे झाले आहेत. या वादामुळे मुंबईतील अनेक नामवंत शाळांच्या ‘नावात’ (की बदनामीत?) चांगलीच भर पडली आहे. हा अनुभव लक्षात घेऊन शाळेने निधी उभारणीसाठी ही कल्पना लढविली आहे.
शेवटी फायदा आमच्या मुलांनाच
‘शाळेने शैक्षणिक विकासासाठी काही सुविधा उभारल्या तर त्याचा फायदा आमच्या मुलांनाच होणार आहे. त्यामुळे, आम्ही शाळेसाठी आनंदाने पैसे द्यायला तयार आहोत,’ असे शाळेच्या एका पालकाने सांगितले. तर शाळेने पैसे जमा करण्यापूर्वी पालकांच्या बैठकीत आम्हाला या सगळ्याची कल्पनाही दिली होती, अशी पुष्टी एका पालकाने जोडली.
पालकांवर बंधन नाही
 शाळेचे मुख्याध्यापक फादर जॉर्ज कालरेस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लगेचच सावध भूमिका घेतली. प्रत्येक पालकाने अमुक इतकेच पैसे द्यावेच, असे आमचे म्हणणे नाही. त्यासाठी आम्ही पालकांवर कोणतेही बंधन घातलेले नाही. पैसे जमा करण्यापूर्वी आम्ही पालकांची बैठक घेऊन त्यांची परवानगीही घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
बक्षीसेही पालकांकडून प्रायोजित
गंमत म्हणजे या लकी ड्रॉमध्ये दिली जाणारी बक्षीसेही पालकांनी प्रायोजित केली आहेत. उदाहरणार्थ ज्या पालकांची इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची दुकाने आहेत त्यांनीच सेलफोन, लॅपटॉप शाळेला देऊ केले आहेत. एकाचे पालक वॉशिंग मशीन कंपनीत कामाला आहेत. तर त्यांनी वॉशिंग मशीन देऊ केले आहे. पालकांनी देऊ केलेल्या या वस्तू शाळेच्या काही कामाच्या नसल्याने त्यांनी त्या लकी ड्रॉमधून पालकांनाच परत करायच्या ठरविल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा