मागच्या २४ वर्षांत केवळ निष्क्रिय आमदारामुळेच नगर शहराचे मोठे नुकसान झाले. या आमदाराच्या स्थानिक विकासनिधीची बारकाईने तपासणी केली तरी मोठा आर्थिक गैरव्यवहार उजेडात येईल, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी केला.
कळमकर व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते सर्जेपुरा येथे नुकतीच पक्षाची शाखा स्थापन करण्यात आली. या वेळी कळमकर बोलत होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, डॉ. रावसाहेब अनभुले, हनिफ जरीवाला, प्रा. माणिक विधाते, शरद क्यादर, अरविंद शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी या वेळी आमदार अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
आमदाराच्या स्थानिक विकास निधीच्या खर्चाची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोळा करावी असे आवाहन करून कळमकर म्हणाले, मागच्या २४ वर्षांत शहराचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या निष्क्रिय आमदाराने केवळ शहराचे नुकसानच केले असे नाही तर, अनेक तरुणांचे संसारही उदध्वस्त केले. ते स्वत:ला ‘मोबाइल’ आमदार म्हणून घेतात, मात्र त्यांच्या मोबाइल फोनचा वापर अधिका-यांना धमकावणे, शिवीगीळ करणे यासाठीच होतो. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका करण्याआधी या आमदाराने त्यांनी केलेल्या विकासकामांवर नजर मारली असती तर डोळे दिपून गेले असते. २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत साधी बालवाडी सुरू करता न आलेल्या या आमदाराला नगरकरांनी आता धडा शिकवावा असे आवाहन कळमकर यांनी केले.
सर्जेपुरा भागात पक्षाची शाखा स्थापन करण्याच्या येथील कार्यकर्त्यांच्या धाडसाचे संग्राम जगताप यांनी कौतुक केले. हा भाग ही काही कोणाची मक्तेदारी नाही असे सांगून महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत ही सत्ता नागरिकांनी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता द्यावी, शहरात ख-या अर्थाने विकास घडवून दाखवू असे ते म्हणाले. मुरलीधर दांगट, बाबासाहेब वाघ, अॅड. बाळासाहेब गोफणे, हबीब शेख आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला. येथील शाखाध्यक्षपदी महेश दांगट व उपाध्यक्षपदी सौरभ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. रमेश जोशी यांनी सूत्रसंचलन केले.
‘गरिबांचीच लूट’
पक्षाचे शहर सरचिटणीस शरद क्यादर यांनी या वेळी राठोड यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ला गरिबांचा नेता म्हणवून घेतात, प्रत्यक्षात गरिबांनाच लूटतात असा आरोप करून ते म्हणाले, शहर उदध्वस्त करण्याचेच काम या आमदाराने केले आहे. लोढा हाईटस या व्यावसायिक इमारतीमधील जागेच्या गैरव्यवहारानंतर आता जिल्हा वाचनालयाच्या जागेतही आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप क्यादर यांनी केला.