शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागात गेल्या चार वर्षांत उपचारादरम्यान १६७ कर्करुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संख्येवरून नागपूर विभागात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असताना त्यादृष्टीने आवश्यक ती पाऊले उचलली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात नागपूरमध्ये कर्करुग्णांचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे एका सर्वेक्षणांती दिसून आले आहे. परंतु त्यादृष्टीने मात्र विदर्भात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. विदर्भातील कर्करुग्णांना चांगले उपचार मिळावे, यासाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागते. विशेषत: कर्करोग हा श्रीमंत नागरिकांना गरीब करणारा आजार असल्याचे समजले जाते. त्यामुळे समाजातील कोणत्याही वर्गातील कर्करुग्ण हे उपचारासाठी सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागात धाव घेतात. माफक दरात उपचार व्हावेत हाच यामागे हेतू असतो. त्यामुळे मेडिकलच्या कर्करोग विभागातच कर्करुग्णांची संख्या दररोज मोठय़ा प्रमाणात दिसून येते. कारण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे हे फारच महागडे झाले आहे.
गेल्या चार वर्षांत मेडिकलच्या कर्करोग विभागात ८ हजार १५२ रुग्णांची नोंदणी झाली. त्यातील ६ हजार ७६७ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. त्यातील १६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०११ मध्ये एकूण २०७८ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यातील १४१४ रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. यामध्ये क्ष-किरणोपचार केल्या जाणाऱ्या व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा समावेश होता. यातील उपचारादरम्यान ३७ कर्करुग्णांचा मृत्यू झाला. २०१२ मध्ये २०९९ रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यातील १६३० रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. त्यातील ४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१३ मध्ये २०९९ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. तर १९१९ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यातील ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २०१४ मध्ये ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत १८७६ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यातील १८०४ रुग्णांना दाखल करण्यात आले. तर त्यातील ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती प्राप्त झाली आहे. १ जाने २०११ ते ३० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत कर्करोग विभागात किती रुग्णांची नोंदणी करण्यात आली, किती रुग्णांना दाखल करण्यात आले आणि त्यातील किती रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती मागितली होती. त्यानुसार ही माहिती त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. याबरोबरच कोलारकर यांनी शरीररचनाशास्त्र विभागाला गेल्या चार वर्षांच्या कालावधीत किती देहदान झाले, याची माहिती मागितली होती. २०११ मध्ये ०७, २०१२ मध्ये ०७, २०१३ मध्ये ०९ आणि १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१४ या अकरा महिन्याच्या कालावधीत १२ असे एकूण ३५ देहदान झाल्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, देहदानाचे प्रमाण फारच अल्प असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलमध्ये एका वर्षांला किमान २० देहदान होणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा