निर्सगाने वेळोवेळी बदलले रंग, केंद्र व राज्य सरकारांचा फळांच्या राज्याला मिळणारा दुजाभाव, शेजारच्या कर्नाटकी हापूसचे आक्रमण, दुबईने केलेला विश्वासघात, भरमसाट आवक आणि त्यामुळे गडगडलेले दर या सर्व कारणांमुळे यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम बागायतदार आणि व्यापारी या दोघांना क्लेशदायक असून कपाळाला हात लावून बसण्याची वेळ या घटकांवर आली आहे. दरम्यान या आठवडय़ात कोकणातील हापूस आंबा हंगामातील शेवटचा निरोप घेणार असून पुढील आठवडय़ात गुजरातच्या हापूस आंब्याची आवक सुरू होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोकणात यावर्षी पडलेला अवकाळी पाऊस व थंडी याचा परिणाम हापूस आंब्याच्या नोव्हेंबर, डिसेंबरमधील फळधारणेवर झाला. ती फळधारणा गळून पडल्याने दुसऱ्या वेळी झालेली फळधारणा तुलनेने कमकुवत झाली. त्यामुळे फळांचा आकार कमी झाला. ह्य़ा नैर्सगिक आपत्तीतून बागायतदार सावरत असतानाच फेब्रुवारीत कडक्याची थंडी पडली. या काळात फळधारणेसाठी उष्णतेची गरज असताना थंडी पडल्याने आंबे परिपक्व होण्यास वेळ लागला. त्यानंतर अचानक खूप मोठय़ा प्रमाणात उष्णता वाढल्याने हापूस आंबे काढून बाजारात पाठविण्याची स्पर्धा सुरू झाल्याने आवक वाढली आणि त्यामुळे भाव कोसळले.
हा दृष्टचक्रातून बाहेर पडत असताना केंद्र सरकारने युनियन महासंघाबरोबर योग्य समन्वय न ठेवल्याने एक मेपासून हापूस आंब्याला युरोप बंदी घालण्यात आली. त्यामुळे शे दोनशे कोटी रुपयांचा युरोपमध्ये जाणारा माल निर्यातदारांना दुबईत वळवावा लागला. दुबईतही आवक वाढल्याने १८ ते २० दिराम प्रती डझन माल विकावा लागल्याने निर्यातीचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असे चित्र दुबईत निर्माण झाले.
दुबईला निर्यात करण्यासाठी सर्वसाधारणपणे २२ दिराम खर्च येतो. त्यामुळे इतकी वर्षे हुकमी बाजारपेठ असणाऱ्या दुबईनेदेखील धोका दिला. हे कमी म्हणून की काय राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने कार्बाईडने पिकविण्यात आलेल्या हापूस आंब्यामुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होत असल्याने काही ठिकाणी हापूस आंबा जप्त केला. त्यामुळे स्वस्त झालेला हापूस आंबा विकत घेण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या ग्राहकाने पुन्हा हात आखडता घेतला. त्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीवर परिणाम झाला. इतकी वर्षे हापूस आंबा चुन्याच्या पुडीने पिकवला जात असून त्यामुळे कॅन्सर झाल्याचे एकही उदाहरण अन्न व औषध प्रशासनाने दाखवावे असा उलट सवाल व्यापाऱ्यांचा आहे. प्रशासनाच्या या तापसणीमुळे व्यापाऱ्यांनी आंबा पिकविण्याचे तंत्र बदलले पण त्यामुळे व्यापाऱ्यांवरील संकट कमी झालेले नाही.
या हंगामात कर्नाटकच्या हापूस आंब्याने बाजारात चांगलाच हंगामा घातला असून कोकणातील हापूस आंब्याच्या या चार महिन्यांत सुमारे ६० लाख पेटय़ा आल्या असल्याचा अंदाज आहे पण त्याच वेळी कर्नाटकच्या हापूस आंब्याच्या ३५ लाख पेटय़ा आल्याचे फळ संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम बागायतदार आणि व्यापारी या दोघांना क्लेशदायक ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक व्यापारी कोकणातील हापूस आंब्याच्या झाडावरील मोहर बघून बागांचे आरक्षण करीत असतात. यावर्षी निर्सगाच्या लंपडावामुळे आंबे लहान आल्याने त्याला उठाव झाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गुंतवलेले पैसे सुटले नसल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या गुजरात आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा बोलबाला आहे. मोदींची संपूर्ण देशावर छाप पडल्याचे चित्र असताना १६ मेनंतर गुजरातमधील हापूस आंब्याची आवक देखील सुरू होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोकणातील हापूस आंब्याचा आठवडय़ात निरोप
निर्सगाने वेळोवेळी बदलले रंग, केंद्र व राज्य सरकारांचा फळांच्या राज्याला मिळणारा दुजाभाव, शेजारच्या कर्नाटकी हापूसचे आक्रमण, दुबईने केलेला विश्वासघात,
First published on: 13-05-2014 at 06:53 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last week of kokans hapus mango