शासनाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक संस्था कर लागू करण्याचा निर्धार केल्यामुळे व्यापारी संघटनांनी त्या विरोधातील आपले आंदोलन आक्रमक करण्याचे सूचित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रास्ता रोको व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शासनावर दबाव वाढविण्यासाठी हे आंदोलन यशस्वी करण्याची जय्यत तयारी व्यापारी कृती समितीने केली होती. शुक्रवारी सकाळी व्यापाऱ्यांनी आधी नाशिकरोड येथे आंदोलन केले. त्यानंतर त्यांचा जत्था मुंबई नाक्यावर येऊन धडकला. मुंबई नाका हा शहरातील प्रमुख चौक. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गासह शहरातील सर्व भागात जाणारे मुख्य रस्ते या चौकातून जातात. आंदोलनासाठी या चौकाची निवड करताना व्यापाऱ्यांनी साकल्याने विचार केला होता. जसजसे व्यापारी जमू लागले, तसतसी पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली. पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील व बाळकृष्ण बोरकर यांच्यासह फौजफाटा या परिसरात दाखल झाला. परंतु, तासाभराने व्यापाऱ्यांची संख्या आणि पोलीस कुमक यांच्यात कमालीची तफावत झाली. जवळपास ५०० ते ६०० व्यापारी जमा झाले आणि त्यांनी ‘एलबीटी’ विरोधात घोषणाबाजी सुरू केली. काळे झेंडे घेऊन आलेल्या आंदोलकांनी चौकातील येणारा-जाणारा प्रत्येक रस्ता व्यापला. परिणामी, सर्व बाजुंकडील वाहतूक बंद झाली.
पोलिसांनी प्रारंभी व्यापाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचे गट विस्तीर्ण चौकात इकडे-तिकडे पळू लागले. व्यापाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी होती. परिणामी, आंदोलकांवर नियंत्रण मिळविताना यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली. तासभर चाललेल्या आंदोलनामुळे सर्व रस्त्यांवरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. व्यापारी पोलिसांनाही जुमानत नव्हते. यावरून कृती समितीचे पदाधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमकही झडली. एकंदर स्थिती लक्षात घेऊन अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे त्यांना पकडून पोलीस वाहनात डांबण्याचे काम हाती घेण्यात आले. साधारणत: १५ ते २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर जेवढे हाती लागले, तेवढय़ांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचे आक्रमक स्वरूप पाहून काही व्यापारी पळून गेले. १६५ हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद होती. केवळ कापड व्यावसायिक आंदोलनातून बाहेर पडले. त्यांची दुकाने शुक्रवारी उघडल्याचे दिसत होते. व्यापारी कृती समितीतर्फे शनिवारी स्थानिक संस्था कराच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात ग्रामीण भागातील व्यापारीही सहभागी होणार असल्याची माहिती धान्य किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली. पुढील काळात या स्वरूपाचा कर त्यांनाही लागू केला जाईल. यामुळे त्यांनाही आंदोलनात सहभागी करून घेण्यात आल्याचे संचेती यांनी सांगितले. बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद असल्याने सर्वसामान्यांना दैनंदिन वस्तु व अन्नधान्याची खरेदी करणे अवघड झाले आहे.
रास्ता रोको करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लाठीमार
स्थानिक संस्था कराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. शहरातील मुंबई नाका चौकात रास्ता रोको करताना गोंधळ घालणाऱ्या व्यापाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-05-2013 at 12:33 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lathi charge on agitator traders who blocked road