संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम योजनेंतर्गत या वर्षी १ लाख ५२ हजार प्रमाणपत्रांचे वितरण करीत लातूरने राज्यात आघाडी घेतल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते. खासदार जयवंत आवळे, आमदार अमित देशमुख व वैजनाथ िशदे, महापौर स्मिता खानापुरे, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, संग्राम योजनेंतर्गत जिल्हय़ातील एकूण ७८७ ग्रामपंचायतींना संगणकाचे वितरण करण्यात आले. विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांद्वारे ३५ लाख उत्पन्न आतापर्यंत ग्रामपंचायतींना प्राप्त झाले. या कामात लातूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. मुरुड ग्रामपंचायतही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेत ‘लातूर पॅटर्न’ निर्माण केल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
खरीप हंगामात १०९ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. ५ लाख ९२ हजार ५८९ हेक्टरपकी ३ लाख ३५ हजार ३६० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ७० हजार ४२ सभासदांना ४ कोटी ९९ लाख रुपयांचे अर्थसाह्य़ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्हय़ाने राबवलेला नंदादीप शाळा उपक्रम देशात सगळीकडे अध्ययन समृद्धी नावाने सुरू आहे, ही लातूरसाठी अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले. थेट अनुदान खात्यावर जमा करण्याच्या योजनेंतर्गत जिल्हय़ात १ लाख १ हजार ८१ लाभार्थ्यांची बँक खाती उघडून ६५ हजार ३६६ आधार कार्डाची नोंदणी पूर्ण झाली आहे. १ हजार ९१७ लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाईन इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजनेंतर्गत निवृत्तिवेतन जमा असल्याचे त्यांनी नमूद केले. लातूरच्या उपविभागीय व तहसील कार्यालयांना नुकतेच आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
लोकसहभागातून ९२ लाख ७६ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून त्यामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता वाढली शिवाय १३ हजार ८४६ हेक्टर जमीन सुपीक होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले. जिल्हय़ातील १५२४६ किलोमीटरचे शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येऊन त्याचा ३२ हजार११४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी, पोलीस प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
संगणकीकृत प्रमाणपत्र वितरणात लातूरची राज्यात आघाडी- पाटील
संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम योजनेंतर्गत या वर्षी १ लाख ५२ हजार प्रमाणपत्रांचे वितरण करीत लातूरने राज्यात आघाडी घेतल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले.
First published on: 17-08-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur ahead state in computerised certificate distribution