चारचाकी व दुचाकी वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ, न केली जात असलेली साफसफाई त्यात रस्त्यावरील धुळीचे प्रमाणाही वाढले आहे. विविध कारणांमुळे हवेतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी प्रदूषण वाढल्याचे दर्शवित आहे.
शहराची व्याप्ती वाढलेली असली तरी गंजगोलाईतील बाजारपेठेत दिवसभर प्रचंड गर्दी असते. औसा रस्ता व अंबाजोगाई रस्ता येथेही गजबज वाढली आहे. तुलनेने एमआयडीसी परिसरातील गर्दी कमी आहे. शहरातील हवा प्रदूषित असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून जाणकार मंडळी करत होती. मात्र, शात्रीय माहिती लोकांसमोर उपलब्ध होत नव्हती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात शहरातील गंजगोलाई, अंबाजोगाई रस्ता व एमआयडीसी भागाची पाहणी करण्यात आली.
१० ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सात वेळा वायू तपासणी करण्यात आली. सल्फर डायऑक्सॉईड, नायट्रोजन व धुलीकणांची संख्या प्रचंड वाढल्याचे निष्कर्ष आहेत. गंजगोलाई व अंबाजोगाई रस्त्यावर हे प्रमाण अधिक आहे. तुलनेने एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी आहे. अर्थात एमआयडीसीतील प्रदूषणानेही धोक्याची पातळी ओलांडलेलीच आहे.
सल्फर डायऑक्साईडचे किमान प्रमाण ६ टक्के असायला हवे. गंजगोलाईत ते ८.४३, अंबाजोगाई रस्त्यावर ८ तर एमआयडीसी परिसरात ६.६७ एवढे आहे. नायट्रोजनचे प्रमाण १५ टक्के असायला हवे. ते गंजगोलाईत १७.१४, अंबाजोगाई रस्त्यावर १६.३३ तर एमआडीसी परिसरात १६.६७ टक्के एवढे आहे. अविघटनशील पदार्थाचे किमान प्रमाण ४३ टक्के असायला हवे. गंजगोलाईत ते ७५.४३, अंबाजोगाई रस्त्यावर ११८ तर एमआयडीसी भागात ५७.१७ एवढे आहे. विघटनशील पदार्थाचे किमान प्रमाण ८७ टक्के असावे. गंजगोलाईत २१७, अंबाजोगाई रस्त्यावर १८४ तर एमआयडीसी भागात १११.६७ एवढे आहे.
वायू प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड हे फुफ्फुसावर परिणाम करतात. त्यामुळे दमा वाढीस लागतो. कफ निर्माण होतो. सर्दीचे प्रमाणही वाढते. सर्दी जुनी असेल तर विषाणूंचा संसर्ग होतो. कार्बन मोनाऑक्साईड शरीरात मिसळून त्याचेही गंभीर परिणाम संभवतात. एमआयडीसी भागात लातूर शहरातील गजबजलेल्या भागापेक्षा हवा चांगली आहे. एमआयडीसीतील उद्योगामुळे हवा प्रदूषित होत नसावी, असा अर्थ काढला जातो. मात्र, तो तितकासा खरा नाही. कारण जुन्या औद्योगिक वसाहतीतील चालू असणाऱ्या उद्योगांचे प्रमाणच कमी असल्यामुळे हवा तुलनेने चांगली राहण्यास मदत झाली आहे.
शहरातील हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांचा वापर कमी हवा. पालिका कचरा घेऊन जात नाही म्हणून नागरिक नाईलास्तव कचरा जाळून टाकतात. मात्र, त्याचे दुष्परिणाम होतात. ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी अवस्था कचऱ्यामुळे झाली आहे. वृक्षलागवडीचे प्रमाण लातुरात राज्यात खालून पहिले आहे. हे प्रमाण वाढवणे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा