केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाने या क्षेत्रातही आता लातूर पॅटर्नची नवी ओळख निर्माण झाली आहे. ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा सत्कार जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमित देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाधिकारी बी. एल. गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे आदी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पालकमंत्री म्हणाले, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लातूर पॅटर्न पुढे आणला. आता स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या गौरवास्पद कामगिरीमुळे जिल्हय़ाच्या नावलौकिकात भर पडली आहे. स्पर्धा परीक्षेचे लातूर येथे कायमस्वरूपी केंद्र सुरू करण्याची सध्या गरज आहे. आमदार अमित देशमुख म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे साधी बाब नाही. देशातील ही सर्वोच्च परीक्षा आहे. लातूर जिल्हय़ातील अनेक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले ही अभिनंदनीय बाब आहे. विद्यार्थ्यांनी सर्वोच्च परीक्षेत यश संपादन केले की विलासराव देशमुख यांना आनंद वाटायचा. लातूर पॅटर्नची चर्चा जिल्हय़ातच नव्हे तर देशभर झाल्याचे आपण अनुभवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा सहा विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले. भविष्यात ही संख्या वाढायला हवी. यावेळी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यूपीएससीची चळवळ लातूरमध्ये उभी राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सर्वाच्या प्रयत्नातून लातूर पॅटर्न निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन भारत सातपुते यांनी केले.
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतही आता ‘लातूर पॅटर्न’
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाने या क्षेत्रातही आता लातूर पॅटर्नची नवी ओळख निर्माण झाली आहे. ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
First published on: 03-06-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur pattern now in upsc exam