मुंबई-लातूर रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करून प्रशासनाने लातूरवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. ६) लातूर बंद व ९ मार्चला रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
या संदर्भात बसवराज वळसंगे, अशोक गोविंदपूरकर, रवींद्र जगताप, रघुनाथ बनसोडे, पप्पू गायकवाड, अ‍ॅड. उदय गवारे, डॉ. संग्राम मोरे, राहुल माकणीकर आदींची बैठक झाली.
 मुंबई-लातूर रेल्वेगाडी नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय घेतल्यामुळे लातूर स्थानकावरून मुंबईला जाणाऱ्या सामान्य नागरिकांची कोंडी होणार आहे. सर्वसाधारण बोगीतून जी मंडळी मुंबईला जातात, त्यांची अडचण होईल. अगोदरच नांदेडहून रेल्वे भरून आली तर येथील प्रवाशांचे काय, असा सवाल बैठकीत विचारण्यात आला.
लातूरहून आणखी एक स्वतंत्र रेल्वे मुंबईसाठी सुरू करावी. लातूर स्थानकाचे सर्वाधिक उत्पन्न आहे. नफ्यात चालणाऱ्या या रेल्वेची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा.
या निर्णयात बदल झाला नाही तर बुधवारी अर्धा दिवस लातूर शहर व बाजारपेठ बंद राहील, तसेच शनिवारी रेल रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. लातूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनी कोणतीच भूमिका न वठवल्यामुळे लातूरकरांवर ही वेळ आल्याची खंतही बैठकीत व्यक्त करण्यात आली.