सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत लातूर जिल्ह्य़ाने विविध उपक्रम राबवून चांगली आघाडी घेतल्याबद्दल विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कौतुक केले.
रेणापूर तालुक्यातील पळशी येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण जयस्वाल यांच्या हस्ते झाले. सहायक जिल्हाधिकारी सुशील खोडवेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एल. गिरी आदी उपस्थित होते. जयस्वाल म्हणाले की, लोकांना विश्वासात घेऊन महसूल विभागाच्या कामांना गती व दिशा देण्याचे काम या अभियानात होत आहे. विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण, फेरफार नोंदी अद्ययावत करणे, शिव व पाणंद रस्ते मोकळे करणे, तलावातील गाळ काढणे या कामांवर विभागात भर देण्यात आला. सात-बारा, आठ अ उतारे अचूक अद्ययावत ठेवून तात्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिव रस्त्यावर खडीकरण, डांबरीकरण करण्याची गरज आहे. ते काम नरेगातून करण्याची सूचना त्यांनी केली. मराठवाडय़ात दरवर्षी कमी होणारे पर्जन्यमान लक्षात घेता तलावातील गाळ काढण्यावर सातत्याने भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
लातूर जिल्ह्य़ात १० लाख मेट्रीक टन गाळ काढण्यात आला. चार हजार किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले. २४ तासांत प्रमाणपत्र योजनेंतर्गत सव्वा लाख प्रमाणपत्रे वितरित झाली. जिल्ह्य़ातील सात-बाराचे उतारे १०० टक्के अद्ययावत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. जि.प. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गुलाबसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शिंगुलवार व मजिप्रचे कार्यकारी अभियंता रमेश सोनकांबळे उपस्थित होते.
टँकर तातडीने देण्याच्या सूचना
पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना कमीत कमी त्रास होईल, असे यंत्रणेने पाहावे. गावक ऱ्यांची मागणी येताच तातडीने टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना जयस्वाल यांनी टंचाई आढावा बैठकीत दिल्या. उपलब्ध पाणीसाठय़ातील पाणी जूनपर्यंत पुरेल या दृष्टीने नियोजन करावे. उद्योगक्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ नये, या साठी औद्योगिक वसाहतीला ५० टक्के पाणी द्यावे, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा