भर पावसात सदाबहार लावण्यगीतांची बरसात!
एकीकडे पहिल्या पावसाने संमेलनस्थळी फेर धरलेला असताना, त्याला न जुमानता ऐनवेळी खुल्या मैदानातून रोटरी सभागृहात जमविलेल्या मैफलीत ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गहिरे रंग भरून अंबरनाथकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. ८१ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या सुलोचना चव्हाण यांनी लावणी गीतांच्या सुवर्ण युगातील काही आठवणींना उजाळा दिलाच, शिवाय त्यातील काही गाऊनही दाखविल्या. अंबरनाथ येथे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
एकेदिवशी भर दुपारी घरी आलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकारामुळे आपल्या सांगीतिक कारकिर्दीला मिळालेल्या कलाटणीची हृद्य हकिकत त्यांनी सांगितली. वसंत पवारांचे ते आशीर्वाद अद्याप आपल्या कुटुंबीयांसमवेत असल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. सुलोचना चव्हाण यांना आचार्य अत्रे यांनी लावणी सम्राज्ञी म्हणून संबोधले. मात्र त्याआधीपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सुलोचना कदम ऊर्फ के. सुलोचना या नावाने त्यांनी बरेच काळ पाश्र्वगायन केले आहे. त्या काळात महम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, मुकेश आदी अनेक गायकांसोबत त्यांनी गाणी गायली. दुर्दैवाने आता त्या काळातील एकही रेकॉर्ड भारतात उपलब्ध नाही. सिलोन रेडिओने मात्र त्यांची ही सर्व गाणी जपून ठेवली आहेत. अजूनही त्यांच्या वाढदिवशी- १३ मार्च रोजी सिलोनवर त्यांच्या हिंदी गाण्यांचा अध्र्या तासाचा कार्यक्रम सादर केला जातो. हिंदीबरोबरच त्यांनी पंजाबी, मल्याळी, तेलगू आदी भाषांमधूनही गाणी गायली. मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी भोजपुरी भाषेत संपूर्ण रामायण गायले आहे.
आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीत सुलोचना चव्हाण यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या मदतीसाठी कार्यक्रम केले. पानशेतच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी कार्यक्रमांबरोबरच घरचे सोनेही विकले. नागालँड युद्धाच्या वेळी तेथील भारतीय सैनिकांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी त्यांनी तिथेही कार्यक्रम केले. अगदी आई वारलेली असतानाही दुसऱ्या दिवसापासून सलग दहा दिवस कार्यक्रम करून त्यांनी ‘शो मस्ट गो ऑनह्णचे तत्त्व पाळले. गिरगावातील फणसवाडीत एका चाळीतील पाचव्या मजल्यावरील छोटय़ाशा घरात राहण्याऐवजी मोठय़ा घरात राहावे असे वाटत नाही का, असे त्यांना विचारले असता ‘चाळच बरी..’ असे उत्तर त्यांनी दिले. संगीत क्षेत्रात कोणताही गुरू केला नाही. लहानपणापासून गाणे ऐकूनच त्यातील बारकावे आत्मसात केले. तोच कित्ता आता मुले गिरवीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. गप्पांच्या या ओघात फड सांभाळ तुऱ्याला गं आला, खेळताना रंग बाई होळीचा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पाडाला पिकलाय आंबा आदी सदाबहार लावण्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. उमेश सावंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमास त्यांचे पुत्र सुप्रसिद्ध ढोलकीपटू विजय चव्हाणही उपस्थित होते. नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्वागत, तर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आभार मानले. अमेय रानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

संपर्कप्रमुखांचा ब्रेक
संमेलन शिवसेना आयोजित असल्याने आधीच पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या मुलाखतीत पुन्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे आल्यावर ब्रेक घेण्यात आला. त्यांच्यासाठी ढोल-ताशे वाजवून फटाकेही फोडण्यात आले. मग सत्काराची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुलाखत सुरू झाली. फटाके आणि ढोलाचे स्वागत टाळून संपर्क नेते सभागृहात येऊन बसले असते तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते, अशी प्रतिक्रिया उपस्थित रसिकांमधून उमटली.

Story img Loader