मुंबई उच्च न्यायालयाचे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ व्हावे, या प्रलंबित मागणीसाठी कराड न्यायालयातील वकिलांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. कराड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन छेडले. परवा बुधवारी (दि. ७) सकाळी भव्य मोर्चाचे आयोजनही करण्यात आले असून, त्यात विविध संघटना, पक्षकार व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या निर्णयावरून हे आंदोलन छेडण्यात आले आहे. दिवसभर वकील वर्गाने केवळ आंदोलनाची भूमिका घेतल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प राहिल्याचे चित्र होते. सकाळी वकिलांनी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीची आवश्यकता पक्षकार व नागरिकांना समजावून सांगितली. यावर पक्षकार आणि नागरिकांनीही वकिलांच्या भूमिकेला समर्थन दर्शविले. कराड न्यायालयातील जवळपास सर्वच वकिलांनी छेडलेल्या निदर्शने व धरणे आंदोलनात विविध सामाजिक, राजकीय पक्षसंघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कराड वकील संघटनेच्या पुढाकाराने कोल्हापूर खंडपीठासाठी येथे सलग तीन दिवस आंदोलन छेडण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर परवा बुधवारी सकाळी साडेदहा वाजता कराड तहसील कचेरीवर निघणाऱ्या भव्य मोर्चात विविध संघटना, पक्षकार व नागरिकांनी सक्रिय सहभाग दर्शवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सायंकाळी वकील सभासदांची बैठक होऊन त्यात कोल्हापूर खंडपीठाची मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. भागवतराव पवार, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप चव्हाण यांच्यासह कराड न्यायालयातील सर्व वकील उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा