भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर भटक्या विमुक्तांची महापंचायत घेण्याचा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करीत माने यांच्या या आंदोलनाला सोलापुरातील तमाम भटके विमुक्त जाती-जमातीची मंडळी तीव्र विरोध करणार असल्याचे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष महेश पवार यांनी सांगितले.
उपराकार लक्ष्मण माने हे स्वत:चे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनी प्रथम आपल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर भटक्यांची महापंचायत भरविण्याची हिंमत दाखवावी व नंतर इतर पक्षांच्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर महापंचायतीचे आयोजन करणे योग्य ठरेल, अशा शब्दात असे आव्हानही महेश पवार यांनी दिले.
विमुक्त भटक्या जमातींना न्या. बापट समितीच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रश्नावर उपराकार लक्ष्मण माने यांनी दिवाळीत, १४ नोव्हेंबर रोजी सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर भटक्यांची महापंचायत भरवून आंदोलन करण्याचा निर्णय अलीकडेच जाहीर केला आहे. त्यास काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती विभागाने जोरदार आक्षेप घेत उपराकारांच्या या आंदोलनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. यासंदर्भात आपली भूमिका विशद करताना काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे शहराध्यक्ष महेश पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर भटक्यांची महापंचायत भरविण्याचा निर्णय केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे.यावेळी महापंचायतीच्या नियमाप्रमाणे डुक्कर, मांजर, बोकड आदी पशुहत्त्या केली जाणार आहे.
परंतु अशा पध्दतीची अघोरी व अमानवी कृत्ये करणे निषेधार्ह असल्याची टीका पवार यांनी केला. सुशीलकुमार शिंदे हे जागरूक असून त्यांनी काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचा राज्यस्तरीय मेळावा घेऊन भटक्या विमुक्तांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. या मेळाव्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महेश पवार यांनी दिली.